विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट – संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता !

१. डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे यांनी विदेशात जाणीवपूर्वक हिंदुविरोधी अपप्रचार करणे

‘डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे ही ‘हिंदु राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व हे संभाव्य संकट आहे’, असा अपप्रचार करून सनातन धर्माच्या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत. वॉशिंग्टनमधून हिंदू बाहेर पडत असण्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नुकतीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या देशांमध्ये भारतविरोधी भावना वाढत चालली आहे. या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देतांना डॉ. जयशंकर म्हणाले, ‘‘भारत अधिक गतीने पुढे चालला आहे. आता जे लोक स्वत: भारताला त्यांची मक्तेदारी आणि भारताचे शिल्पकार समजतात, त्यांना फारसे महत्त्व उरलेले नाही. खरे म्हणजे अशी भाषा करणारे बाहेर पडले आहेत.’’ लिसेस्टर (ब्रिटन) आणि न्यू जर्सी (अमेरिका) येथील ‘टिनॅक डेमोक्रॅट्स’ पक्षाने घेतलेला हिंदूच्या विरोधातील ठराव, ही गोष्ट चर्चा करण्याच्या पलीकडची आहे. अशा घटनांमुळे धार्मिक आणि भाषण स्वातंत्र्य यांविषयी भीती, तसेच आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील सुरक्षाविषयक गुप्तचर आणि सत्तेत असलेले पुरोगामी यांच्या हुकूमशाहीवर प्रकाश पडला आहे. या पार्श्वभूमीवर जो बायडेन यांच्या न्याय खात्याच्या स्कूल बोर्डाने ‘हिंसाचार’विषयी केलेले निवेदन लक्षात ठेवले पाहिजे.

२. अमेरिका आणि इंग्लंड येथे विविध ठिकाणी हिंदुद्वेष्ट्यांकडून हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे

गेल्या काही मासांमध्ये अमेरिकेत भारत आणि हिंदु विरोधी भाषणे देण्यात आली, तसेच तेथे हिंदुद्वेषाने घडलेल्या गुन्ह्यांची मालिकाच चालू झाली आहे. न्यूयॉर्कमधील रिचमंड हिल्स भागातील हिंदु मंदिरात गुन्हेगारांनी म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. फ्रिमाँट येथील एका ‘फास्ट फूड’च्या दुकानात अकारण निर्माण केलेला वर्णद्वेष आणि हिंदुविरोधी वातावरण यांमुळे एका हिंदु माणसाला मारण्यात आले. याखेरीज टेक्सासमध्ये एक महिला वर्णद्वेषी भाषा बोलून भारतीय महिलांना मारहाण करत असल्याची चित्रफित सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. त्यानंतर इंग्लंडमधील लिसेस्टर येथे झालेल्या हिंदुविरोधी दंगलीमध्ये जिहाद्यांनी हिंदूंची घरे आणि श्रद्धास्थाने यांची नासधूस केली. तेथे अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे  जगभरातील हिंदूंना मोठा धक्का बसला आहे. या आक्रमणातून हिंदू सावरतात नाही, तोच ‘टिनॅक डेमोक्रॅटस’ यांच्या हिंदुविरोधी ठरावामुळे दुसरा धक्का बसला आहे.

३. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या संचलनाला धर्मांध संघटनांनी विरोध करणे आणि संचलनाच्या आयोजकांना क्षमा मागण्यास भाग पाडणे

न्यू जर्सी येथे शहराच्या बाहेर ४० सहस्र रहिवाशी असलेली ‘टिनॅक टाऊनशिप’ आहे. तेथे ‘इंडियन बिझनेस असोसिएशन’ या नावाखाली भारतीय-अमेरिकी समाजाने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानिमित्त एक संचलन आयोजित केले होते. या संचलनामध्ये अन्य चित्ररथासमवेत एक बुलडोझर ठेवण्यात आला होता. याखेरीज त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यामुळे संचलन संपल्यावर आयोजकांविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटली. याला विरोध करण्यासाठी ‘भारतीय अमेरिकी मुस्लिम काऊंसिल’ (आय.ए.एम्.सी.) हा भारतीय मुसलमानांचे प्रतिनिधीत्व करणारा गट आघाडीवर होता. या संचलनातून ‘पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या अल्पसंख्यांकांविरोधी धोरणाला मान्यता देण्यात आली’, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर लगेच ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर (वर्णद्वेषी नागरीकांवरील पोलीस हिंसाचाराविरुद्ध चालवलेली चळवळ)’, ‘अमेरिकन मुस्लिमस् फॉर डेमॉक्रसी’, तसेच डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि जिहादी गट सक्रीय झाले. ‘आय.ए.एम्.सी.’ संघटनेने अमेरिकेचे न्याय खाते, न्यू जर्सीचे ॲटर्नी जनरल आणि ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन’ (एफ्.बी.आय.) यांच्याकडे ‘संचलनाचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली. त्याखेरीज या संघटनेने तेथील एडीसन पोलीस खात्याकडे तक्रार नोंदवली. या संघटनेने ‘संचलनाचे मुख्य अतिथी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचे पारपत्र रहित करावे’, अशीही मागणी केली.

नगरपालिकेचे अध्यक्ष अलेक्झांडर सोरीआनो तावेसर यांच्या नेतृत्वाखाली ‘टिनॅक डेमोक्रॅट्स’ यांनी संचालनाचे आयोजन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उल्लेख ‘विदेशीद्वेष करणारे गट’, असा केला. अमेरिकेचे सिनेटर बॉब मेनिनडेझ आणि कोरी बुकर यांच्यासह डेमोक्रॅट्सच्या अनेक प्रमुख सदस्यांनी ‘आय.ए.एम्.सी’ संघटनेच्या समर्थनार्थ विधाने केली. या दबावामुळे या संचलनाच्या आयोजकांना क्षमा मागावी लागली. त्यांनी दिलेल्या क्षमापत्रात म्हटले आहे, ‘आमचे संचलन राजकीय नको होते. तसेच त्यामध्ये फूट पाडणारी चिन्हे असायला नको होती. यापुढे आम्ही अशी चिन्हे  वापरणार नाही, तसेच दक्षिण आशियाई परंपरा राखत विविध गटांना संचलनात सहभागी करून ते संचलन न्यू जर्सीसाठी चांगले कसे होईल, याची काळजी घेऊ.’

४. अमेरिकी प्रसारमाध्यमांनी हिंदुद्वेष्ट्यांचे समर्थन करणे

‘टिनॅक डेमोक्रॅट्स’ने केलेला हिंदुविरोधी ठराव, तसेच ‘भारतीय अमेरिकी मुस्लिम काऊंसिल’ आणि इतर हिंदुविरोधी गट यांच्यामुळे दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे भारताला देवभूमी आणि मातृभूमी मानणार्‍या हिंदूसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे यांच्यामुळे हिंदूंच्या विरोधात नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. हिंदूंचा अपमान करणे आणि जगातील प्राचीन अन् सर्वांत उदार विचारसरणी असलेल्या हिंदु धर्मियांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी ते विषय समजून न घेता हिंदु राष्ट्रीयत्व, हिंदुत्व आणि जातीय दडपशाही यांची भूते नाचवत आहेत.

५. पाश्चात्त्यांचे भारतीय संस्कृती, साहित्य आणि परंपरा यांविषयीचे अज्ञान हिंदुद्वेषाला कारणीभूत असणे

पाश्चिमात्यांचे ‘भारतीय संस्कृती, साहित्य आणि परंपरा यांविषयीची मते अन् वास्तविकता यांच्यात तफावत आहे’, हे आता गुपित राहिलेले नाही. अलीकडेच ‘प्यू रिसर्च सेंटर’ने  ‘रिलीजन्स ऑफ इंडिया’ या विषयावर सर्वेक्षण केले. त्यातून कथित गोष्टी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांतील मतभेद लक्षात आले. वसाहतवादी आणि मार्क्स विचारवादी यांच्या व्याख्यानातून त्यांनी भारताविषयीची मूळ अन् अधिकृत माहिती देण्याऐवजी संशयास्पद आणि विकृत माहिती दिली जाते. त्यामुळे मूळ भारतीय हिंदूंना त्यांच्यामध्ये क्वचित् जागा मिळते. त्यामुळे ‘हिंदू हे येथील नाहीत’, हा समज पाश्चिमात्यांमध्ये दृढ झाला आहे. शैक्षणिक आणि प्रसिद्धी यांच्या सादरीकरणातूनही त्याचे प्रकटीकरण होत असते. त्यात जे हिंदू नम्रपणे मूळ भारतीय नसलेल्यांचे हुकूमनामे स्वीकारतात, त्यांनाच स्वीकारले जाते.

६. अमेरिकेतील उच्च राजकीय पदावरील लोकांना भारतीय हिंदूंच्या समस्या मांडण्यात अपयश येणे आणि हिंदूंना धमकावण्याचे अन् कमकुवत करण्याचे षड्यंत्र असणे

भारतीय-अमेरिकी समाजातील सदस्य उच्च राजकीय पदांवर आहेत. असे असूनही भारतीय हिंदूंच्या समस्या मांडण्यात तेथील भारतीय समाजाला अपयश आले आहे. अलीकडेच अमेरिकेतील हिंदूंवर झालेल्या आक्रमणांतून ही उणीव स्पष्ट जाणवली आहे. सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे अनेक हिंदू पुरोगामी अमेरिकी नागरीकांच्या वर्णाविषयी विधानांमध्ये अडकलेले आहेत. त्यांना एकतर हिंदुद्वेष दिसत नाही किंवा हिंदुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या भीतीपोटी ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. उदाहरणार्थ टेक्सास येथे हिंदुद्वेषाचे लक्ष्य ठरलेल्या एका कुटुंबातील सदस्याने या घटनेचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी करू नये, असे ‘ट्वीट’ केले आहे.

हिंदु संघटनांच्या निषेधाचा किंवा अशा काही संघटनांच्या अहवालांचा आणि वक्तव्यांचा काही परिणाम होईल, असे म्हणता येणार नाही; पण अमेरिका, युरोप आणि अन्य देशात भारत, हिंदू आणि हिंदु संघटना यांच्या विरोधात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तो दूर करणे कठीण आहे. हिंदूंना धमकावण्याचे आणि कमकुवत करण्याच्या षड्यंत्राचा हा परिणाम आहे की, अमेरिकेत हिंदु संघटनांशी संबंधित लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका खटल्यातील फिर्यादी दलित कर्मचारी असल्याचे नुकतेच कळले. हिंदु जातीतील उच्चवर्णीय लोकांकडून भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी खटल्यात केला, म्हणजेच हे प्रकरण जातीच्या आधारे भेदभावाचे आहे. अमेरिकेत रंग, वंश इत्यादींच्या आधारे भेदभाव करण्याविरुद्ध कडक कायदे आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

७. विदेशातील भारतियांनी भारताच्या हितासाठी बोलण्यास प्रारंभ केल्याने हिंदु विरोध होऊ लागणे

ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. तुम्हाला लक्षात येईल की, काही काळापासून जागतिक नेते, स्वयंसेवी संस्था, बुद्धीवादी, मानवाधिकार संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या एका वर्गाने भारताचा कारभार, वातावरण, सत्ताधारी पक्ष, संघ परिवार अन् त्याच्याशी संबंधित संघटना इत्यादींविषयी मोठ्या प्रमाणात विरोधी प्रचार मोहीम चालू केली आहे. गेल्या काही वर्षांत भारत ज्या पद्धतीने जागतिक स्तरावर जोमाने आणि बोलका झाला आहे अन् जगभरातील भारतीय स्वतःची सभ्यता, संस्कृती, धर्म, ओळख इत्यादींसह भारताच्या हितासाठी खुलेपणाने पुढे आले आहेत, तेव्हापासून हिंदु विरोध होऊ लागला आहे.

८. नोबेल पुरस्कारासाठीची नावे उघड केली जात नसतांना हिंदुद्वेषी जुबेर अहमद याचे नाव मुद्दामहून खुले केले जाणे

नूपुर शर्मा आणि ‘अल्ट न्यूज’चे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांच्यासह एका चर्चासत्राच्या वादात अडकलेल्या हिंदुद्वेषी जुबेर अहमद यांचे ‘नोबेल’ पारितोषिकासाठी नामांकन करण्यात आले होते. यावरून त्यांची ‘इकोसिस्टम’ (धर्मांधांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवण्यासाठी केलेली कार्यप्रणाली) किती मजबूत आहे, हे लक्षात येते. गेल्या ५० वर्षांपासून नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत कोण आहे ? याविषयीची माहिती नोबेल समिती उघड करत नाही. असे असतांना जुबेर याचे नाव नॉर्वेजियन कायदेकर्त्यांनी जाणूनबुजून बाहेर आणले होते. ‘टाइम’ मासिकाने यावर अहवाल दिला होता आणि ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने सर्वेक्षण केले होते. साहजिकच अशा विस्तृतपणे संघटित गटाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखली पाहिजे, अन्यथा आज आपण कल्पनाही करू शकत नाही, असे सर्व काही आपल्याला आणि येणार्‍या पिढ्यांना भोगावे लागेल.

– अवधेश कुमार

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, १७.१०.२०२२)

संपादकीय भूमिका

विदेशात होणारा हिंदुत्वविरोधी अपप्रचार आणि हिंदूंवर करण्यात येणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र अपरिहार्य !