कल्याण-डोंबिवली येथे विनाअनुमती उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांवरील कारवाई थंड !

आयुक्तांचे आदेश कागदावरच असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निश्चित केलेल्या मैदानांतच विक्रेत्यांनी फटाक्यांची विक्री करावी. मैदाने सोडून मंच लावून रस्त्यांवर फटाके विक्री करणार्‍या दुकानांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रभाग सहाय्यक आयुक्तांना दिले होते; मात्र असे असले, तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विक्रेते रस्त्यालगत मंच उभारून फटाक्यांची विक्री करत आहेत. त्यामुळे आयुक्तांचे आदेश निव्वळ कागदावरच राहिल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे ‘एखादी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?’, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शासनानेही फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या जागेत वा पटांगणात देण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे, तर शासनाने सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारतीमध्ये फटाके विक्रीस अनुमती देऊ नये. अवैध फटाके विक्री वा साठवणूक यांवर तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाची अधिसूचना सुद्धा फटाक्यांच्या विक्रीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून अनुमती हवी असे सांगते. २ विक्री केंद्रांमध्ये किमान ३ मीटर अंतर हवे, असे केंद्राच्या अधिसूचनेत स्पष्ट आहे. शिवाय फटाके हे अतिशय स्फोटक असल्याने भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महानगरपालिका अन पोलिसांना बंधनकारक आहे.

असे असले तरी शहरात गल्लीबोळापासून मुख्य रस्ते, मुख्य नाके, सार्वजनिक ठिकाणी अगदी ज्वलनशील गॅस आदी वापरणार्‍या हातगाड्यांच्या लगत ही अवैध फटाके विक्री करणारी केंद्रे उभारण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, कायदे आणि नियम यांचे उल्लंघन होत असतांनाही प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.