सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरकासुर प्रतिमादहन करण्याच्या प्रकारांत मोठ्या प्रमाणात वाढ

सिंधुदुर्गमध्ये नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे

सिंधुदुर्ग – नरकासुर या दैत्याचा वध करून त्याच्या त्रासापासून समाजाचे रक्षण करणार्‍या श्रीकृष्णाचा जयजयकार होणे अपेक्षित असतांना आता जिल्ह्यात नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. गोवा राज्यात प्रामुख्याने चालणारी ही कुप्रथा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. २३ ऑक्टोबर या दिवशी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात सर्वत्र नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्याच्या स्पर्धा आयोजित यांचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचे स्पष्ट झाले.

प्रारंभी नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात युवकांचा मोठा सहभाग असायचा. आता तर लहान मुलेही स्वतंत्रपणे नरकासुराच्या प्रतिमा बनवू लागली आहेत. एवढेच नव्हे, तर नरकासुराच्या मोठ्या प्रतिमांच्या स्पर्धांसह आता लहान मुलांनी बनवलेल्या प्रतिमांचीही स्पर्धा आयोजित केली जाते. काही ठिकाणी या प्रतिमा बनवण्यात १५ दिवस आधीपासून प्रारंभ केला जातो. रात्री विलंबाने जागून या प्रतिमा बनवल्या जातात. या प्रतिमांसाठी विविध वस्तू गोळा करणे, नरकासुर सर्वाधिक अक्राळविक्राळ दिसेल, असा प्रयत्न करणे चालू असते. याचा अर्थ या प्रतिमांचे दहन होईपर्यंत मनात बहुतांश वेळा नरकासुराचाच विचार असणार हे नाकारून चालणार नाही.

यावर्षी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नव्हे, तर मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत या प्रतिमा जाळल्या गेल्या. मोठमोठे फटाके फोडणे, डिजेवरून (ध्वनीक्षेपकांवरून) कर्णकर्कश आवाजात गाणी लावून नाचणे आदी प्रकार केले गेले. काही ठिकाणी तर वाहनचालकांकडून पैसे मागून वाटमारी करण्याचाही प्रयत्न झाला. रात्रभर मजा करून पहाटे नरकासुराच्या अवाढव्य प्रतिमा जाळल्या गेल्या. यामुळे वायूप्रदूषण तर झालेच, त्याचबरोबर प्रतिमा बनवण्यासाठी वापरलेला लोखंडी सांगाडा, टोकदार खिळे असे न जळणारे साहित्यही बर्‍याच ठिकाणी तसेच पडलेले होते.

ररस्त्यावर मधोमध जाळण्यात आलेल्या नरकासुर प्रतिमा आणि नंतर जमलेला कचरा दिसत आहे

(सर्व चित्रे प्रतिकात्मक म्हणून पहावीत – संपादक)


युवापिढीच्या कलागुणांना वाव देण्याच्या नावाखाली चुकीचा पायंडा पाडत आहे, याचा विचार होणे आवश्यक !

कलागुणांना वाव देणे, मौजमजा करणे याच्या नावाखाली नरकासुर प्रतिमादहनांचे वाढते प्रकार लक्षात घेता समाजात चुकीचा पायंडा पडतोय का ? याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. यामध्ये राजकीय पक्ष, मित्रमंडळे, तसेच काहीजण वैयक्तिक स्तरावर या स्पर्धा आयोजित करतात. यावर्षी बांदा, सावंतवाडी, कुडाळ, मालवण यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.