बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या परीक्षेत गोमांसाविषयी प्रश्‍न विचारल्याने विद्यार्थी संतापले

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या ‘बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स’च्या परीक्षेत गोमांसविषयी प्रश्‍न विचारण्यात आल्यानंतर विद्यार्थी संतापले आहेत. ‘गोमांस म्हणजे काय ? त्याचे वर्गीकरण कसे केले जाते आणि त्याची प्रक्रिया काय असते ?’, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. (गोमाता हिंदूंसाठी पूजनीय आहे, याची पूर्ण कल्पना असतांनाही गोमांसाविषयी परीक्षेत प्रश्‍न विचारणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनाचा जाणूनबुजून केलेला अवमान आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते ! – संपादक) त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरु आणि कुलसचिव यांना पत्र लिहून उत्तरदायी शिक्षक, अभ्यासक्रम समन्वयक आणि संबंधित अधिकारी यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘असे प्रश्‍न विचारणे हे विद्यापिठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या स्वप्नांच्या विरोधात आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी नेहमी गोवंशाच्या रक्षणासाठी काम केले. अशा स्थितीत बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात गोमांसावर प्रश्‍न विचारणे अयोग्य आहे’, असे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी संतप्त विद्यार्थ्यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ चालू केलेल्या विश्‍वविद्यालयामधील परीक्षेत असा प्रश्‍न विचारला जाणे, संतापजनक होय !