धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे देशातील लोकसंख्येत असमतोल ! – सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची मागणी

डावीकडे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे भारताच्या लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहार यांसारख्या विविध जिल्ह्यांत, तसेच राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केली. ते येथे आयोजित रा.स्व. संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना ही मागणी केली. ‘धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा कोणताही लाभ देण्यात येऊ नये,’ अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

१. दत्तात्रय होसबळे पुढे म्हणाले की, धर्मांतरामुळे अनेक ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या न्यून होत असून त्याचे परिणामही भोगावे लागतात. हे याआधीही झाले आहे आणि त्याच्या समस्याही जाणवल्या आहेत. धर्मांतराविषयी जनजागृती करण्याचे काम संघाकडून केले जात आहे. घरवापसी मोहिमेचे चांगले परिणाम पुढे आले आहेत. घरवापसी मोहीम इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांत गेलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी राबवली जात आहे. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक कायदे झाले; पण या कायद्यांची कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. उत्तरप्रदेशसह अन्य काही राज्यांत बलपूर्वक धर्मांतर करण्यास मनाई आहे.

२. सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत १६ ते १९ ऑक्टोबरपर्यंत आयोजित कार्यकारी मंडळाच्या या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीत देशभरातील ३७२ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. देशात संघाच्या शाखांची संख्या ६१ सहस्र ४५ वर पोचली आहे.