सातारा येथे साहाय्यक फौजदाराकडून युवतीचा विनयभंग

महेश मारुति मगदूम

कराड, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा येथे पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी आलेले कोल्हापूर येथील साहाय्यक फौजदार महेश मारुति मगदूम यांनी एस्.टी.मध्ये एका महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केला. महामार्गावरील वळसे ते काशीळ प्रवासात ही घटना घडली. याविषयी पीडित युवतीने कराड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. (पोलीसच असे प्रकार करू लागले, तर महिलांचे रक्षण कोण करणार ? – संपादक)

पीडित युवती सातारा येथील असून कराड येथे शिक्षणासाठी रहात आहे. १७ ऑक्टोबर या दिवशी परीक्षा असल्यामुळे ती कराड येथे एस्.टी. ने निघाली होती. काही वेळात एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ येऊन बसली. ‘मी कोल्हापूर येथे पोलीस असून आपण मित्र बनू, भ्रमणभाषवर चॅटिंग करूया’, असे बोलून भ्रमणभाष क्रमांक मागितला; मात्र युवतीने यासाठी नकार दिला. एवढ्यावर न थांबता त्या व्यक्तीने युवतीच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे चालू केले. पीडित युवतीने काशीळ गावाजवळ त्या व्यक्तीला दुसर्‍या ठिकाणी बसण्यास सांगितले, तसेच या प्रकाराची माहिती कराड येथील तिचा वर्गमित्र, कराड बसस्थानकातील पोलीस आणि कुटुंबीय यांना दिली. कराड पोलिसांनी बस कराड बसस्थानकात येताच संशयिताला कह्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. तेव्हा ही व्यक्ती कोल्हापूर पोलीस दलात साहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. कराड शहर पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा नोंद झाला असून ही घटना बोरगाव पोलीस ठाण्याच्या सीमेत घडल्यामुळे हा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

जनतेचे रक्षकच बनले भक्षक !