रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेले पालट !

कु. दिव्या शिंत्रे

१. आश्रमात प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा मिळाल्यावर मनात नकारात्मक विचार येणे

‘मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आश्रमात गेल्यावर मला प्रथमच प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा मिळाली. तेव्हा प्रथम माझ्या मनात ‘मला ही सेवा जमेल का ? मला हीच सेवा का मिळाली ? ही सेवा मला किती दिवस करावी लागणार ?’, असे नकारात्मक विचार आले. मी ती सेवा मनापासून करत नव्हते. मला प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा करतांना घाण वाटायची.

२. अन्य साधकांचा भाव आणि सेवा करण्याची तळमळ बघून सेवा मनापासून स्वीकारली नसल्याचे लक्षात येणे; परंतु ‘प्रयत्न कसे करावेत ?’ हे लक्षात न येणे

प्रतिदिन सकाळी स्वच्छतेची सेवा करणार्‍या सर्व साधकांचा सत्संग असायचा. एकदा काही साधकांनी ‘ही सेवा तळमळीने आणि भावाच्या स्तरावर कशी केली ?’, हे सांगितले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘साधक या सेवेत भाव कसा काय ठेवू शकतात ?’ अन्य साधकांचा भाव आणि सेवा करण्याची तळमळ बघून ‘मी ती सेवा भावपूर्ण करत नाही. मी यांत्रिक पद्धतीने सेवा करत आहे आणि मी ती मनापासून स्वीकारली नाही’, हे माझ्या लक्षात आले; पण ‘प्रयत्न कसे करावेत ?’ हे माझ्या लक्षात येत नव्हते.

३. आढावा सेविकेचे साहाय्य घेणे, सेवा करतांना जयघोष, प्रार्थना आणि मधेमधे भावप्रयोग करणे अन् हळूहळू सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यावर सेवेतून आनंद मिळू लागणे

मी माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या आढावा सेविका सौ. अर्चना घनवट यांचे साहाय्य घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गुरुदेवांना संपूर्ण शरण जाऊन सातत्याने प्रार्थना करत होते. मी सेवेला आरंभ करतांना जयघोष करू लागले. आरंभीच्या टप्प्याला मधेमधे भावप्रयोग करू लागले. नंतर हळूहळू ती सेवा परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले. तेव्हा मला प्रसाधनगृहाची स्वच्छता करतांना आनंद मिळू लागला.

४. सेवेशी एकरूप झाल्यामुळे प्रसाधनगृहातील सर्व वस्तू सजीव वाटू लागणे

मला सहसाधकांच्या माध्यमातून पुष्कळ शिकता आले. देव सगळ्यांच्या माध्यमातून मला सेवेतील बारकावे शिकवत होता. हळूहळू माझे मन त्या सेवेशी एकरूप होऊ लागले. मला प्रसाधनगृहातील सर्व वस्तू सजीव वाटू लागल्या. ‘त्यांच्याशी कसे बोलायचे ? त्या वस्तू स्वच्छ कशा करायच्या?’, हेसुद्धा मला त्या वस्तूंनीच शिकवले.

५. सकारात्मक राहून प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा केल्यामुळे साधिकेमध्ये झालेले पालट

अ. आरंभी प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा मिळाल्यावर माझ्या मनात नकारात्मक विचार होते. नंतर प्रसाधनगृहातील प्रत्येक वस्तूकडे पाहिल्यावर माझी भावजागृती होऊ लागली.

आ. आरंभी मी प्रसाधनगृहातील काही वस्तू नीट स्वच्छ केल्या नाहीत; म्हणून मी कान धरून श्रीकृष्णाची आणि त्या वस्तूंची क्षमा मागितली. त्यानंतर मला प्रसाधनगृहाविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण झाले.

इ. प्रथम मला प्रसाधनगृह स्वच्छ करतांना घाण वाटत असे. आता ती ‘सेवा आहे’, असे समजून केल्यावर त्यातून ‘या सेवेतून आपला अहं नष्ट होणार आहे’, याची मला जाणीव झाली आणि ती कृती मनापासून अन् पुढाकार घेऊन करता येऊ लागली.

ई. प्रसाधनगृह आणि शौचालय स्वच्छ करणे, या कृती करतांना आधी घाण वाटत असे; पण आता या कृती ‘अजून तळमळीने कराव्यात’, असे वाटू लागले.

उ. प्रसाधनगृहाची लादी घासतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यामध्ये असणारे सूक्ष्म स्तरावरील स्वभावदोष आणि अहं नष्ट करून माझे मन निर्मळ करत आहेत’, असा भाव माझ्यात निर्माण झाला.

ऊ. ‘निर्जीव वस्तूंप्रती कसा भाव ठेवायचा ?’, हे मला शिकायला मिळाले.

ए. मी प्रसाधनगृहातील प्रत्येक वस्तूकडे ‘गुरुसेवक’ म्हणून बघू लागले.

६. अन्य सूत्रे

अ. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी माझ्यामध्ये ‘नियोजनक्षमता, पुढाकार घेणे, नेतृत्व, इतरांचा विचार करणे, सेवा परिपूर्ण आणि भावासहित करणे, अशा गुणांची वृद्धी केली.

आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक सेवा आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्यामध्ये गुणवृद्धी व्हावी, या हेतूनेच दिलेली असते’, याची मला जाणीव झाली.

गुरुदेवांच्या कृपेमुळे मला प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची सेवा स्वीकारता आली आणि त्यांनी ती सेवा माझ्याकडून परिपूर्ण करून घेतली, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे), कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक