वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी चालू झाली. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. या सत्संगांत विविध राज्यांतील अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले आणि त्यांनी सत्संगांत सांगितल्याप्रमाणे साधना करण्यास चालू केले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत. १४.१०.२०२२ या दिवशी या मनोगतांचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/619915.html |
२. हरियाणा
२ अ. सौ. गार्गी दुरेजा, फरिदाबाद
२ अ १. आरंभी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना पुष्कळ त्रास होणे आणि नंतर चांगले वाटणे : ‘सत्संगात मंत्रजपाची योग्य पद्धत सांगितल्यामुळे मला पुष्कळ चांगल्या अनुभूती आल्या. घरातील सर्वांमध्ये सकारात्मकता जाणवत आहे. आरंभी मला श्री दत्तगुरूंच्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाने त्रास झाला; परंतु नंतर पुष्कळ चांगले वाटले. मी माझ्या मैत्रिणींनाही नामजप करण्यास सांगितले असून त्यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे.
२ अ २. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर मैत्रिणींना आलेल्या अनुभूती
अ. माझ्या एका मैत्रिणीच्या कुटुंबाचे कुणाशी तरी भांडण झाले आणि ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. तेव्हा मैत्रीण आणि तिची मुलगी दोघी नामजप करत होत्या. त्या भांडणाचा निर्णय मैत्रिणीच्या बाजूने लागला आणि ‘हे नामजपामुळेच झाले आहे’, असा तिला विश्वास वाटू लागला.
आ. माझ्या एक मैत्रिणीला रात्री झोप लागत नव्हती. नामजप करायला लागल्यापासून तिला चांगली झोप लागत आहे.’
२ आ. सौ. शोभना शर्मा, फरिदाबाद
२ आ १. कुठलेही काम करतांना ‘ईश्वराची सेवा करत आहे’, या भावाने केल्यामुळे थकवा किंवा राग न येणे : ‘काही दिवसांपासून मी सनातन संस्थेचे सत्संग ऐकत आहे. नामजप ऐकल्यानंतर पूर्ण दिवसभर माझ्याकडून नामजप होत रहातो. । ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप मी सतत करते. मला सत्संगाचाही पुष्कळ लाभ होतो. माझ्या मनात आता चुकीचे विचार येत नाहीत आणि चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्नही माझ्याकडून होतात. कुठलेही काम करतांना माझ्या मनात ‘मी ईश्वराचीच सेवा करत आहे’, हा विचार असतो. त्यामुळे काम करतांना मला थकवा किंवा राग येत नाही.’
२ इ. सौ. आरती नागर, फरिदाबाद
२ इ १. नामजपामुळे मनावरील ताण आणि चिंता न्यून होणे : ‘सत्संग ऐकल्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. नामजपामुळे माझी चिंता थोडी न्यून झाली असून मला आतून पुष्कळ शांत वाटू लागले आहे. काही वेळा मनावर ताण आल्यावर मी नामजप केला. तेव्हा तो ताण न्यून झाला. माझा भगवंतावरील विश्वास आता वाढला आहे. ‘भगवंत माझ्या समवेत आहे’, असे मला काही वेळा जाणवते. त्यामुळे बाहेरच्या जगाकडचे माझे लक्ष न्यून झाले आहे.’
३. उत्तरप्रदेश
३ अ. श्री. विपिनकुमार कौशिक, गाजियाबाद
३ अ १. सत्संगामुळे मन सकारात्मक आणि शांत होणे : ‘मी एप्रिल २०२० मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हा मीही सर्व लोकांप्रमाणे कोरोनाच्या त्रासाशी झुंजत होतो. मी ‘ऑनलाईन’ सत्संगात भाग घेतला. तेथे मिळालेल्या ज्ञानानुसार मी कृती करायला चालू केल्यावर माझ्या जीवनात पुष्कळ सकारात्मक पालट झाले. आज मी मानसिकदृष्ट्या पुष्कळ सक्षम आणि शांत झाल्याचे अनुभवत आहे.’
३ आ. सौ. बबीता सिंह, आग्रा
३ आ १. ‘परात्पर गुरु डॉक्टरच सत्संग घेत आहेत’, असे वाटणे : ‘सत्संगामुळे आम्हाला पुष्कळ लाभ झाला आणि पुष्कळ आधार मिळू लागला. सत्संगाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच आमच्यासाठी सत्संग घेत आहेत’, असे आम्हाला वाटत होते. बाहेरची भयानक स्थिती विसरून आम्हाला सात्त्विक वातावरण अनुभवता येत होते. मुलांनाही सत्संग ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यांनाही आध्यात्मिक माहिती मिळाली.’
४. झारखंड
४ अ. सौ. अर्चना सिंह (अर्चना कुमारी), जमशेदपुर
४ अ १. घरातील सर्वांनी नामजप करायला आरंभ केल्यावर घरातील वातावरण चांगले होणे आणि गुरुपौर्णिमेला अर्पण दिल्यावर घरच्या परिस्थितीत चांगली सुधारणा होणे : ‘माझे नामजप करणे जवळजवळ बंदच झाले होते; परंतु ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे माझा नामजप पुन्हा चालू झाला आणि घरातील वातावरणही चांगले झाले. माझे यजमान आणि मुलगा यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे. खरेतर दळणवळण बंदीमुळे वेतन अल्प मिळत आहे; परंतु गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने आमचे सर्व व्यवस्थित चालले आहे. आमची गुरुपौर्णिमेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होती; म्हणून आम्ही अर्पण केले. त्यानंतर आमच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली.
मी देवपूजा करतांना गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. तेव्हा माझ्या डोळ्यांतून आपोआप भावाश्रू येऊ लागतात. आम्हा सर्वांवर गुरुदेवांची पुष्कळ कृपा आहे. माझ्या यजमानांचे कामही चांगले चालले आहे आणि माझ्या मुलाचे शिक्षणही चांगले चालले आहे.’
५. नीशा लाहोटी, कोटा, राजस्थान.
‘मागील ६ मासांपासून मी या सत्संगाचा आनंद घेत आहे. या सत्संगामुळे मला वेगवेगळ्या संतांची माहिती मिळाली. मानस दर्शन करतांना मला अनेक मंदिरांचे दर्शन झाले. या मंदिरांविषयी मला आतापर्यंत काहीच ठाऊक नव्हते. हे सत्संग ऐकल्यानंतर माझ्या मनात सकारात्मकता निर्माण झाली आहे. ज्या दिवशी सत्संग ऐकायला मिळत नाही, त्या दिवशी मला खूप वेगळे आणि रितेपण जाणवते. ‘कोरोना’रूपी आपत्काळात या सत्संगांमुळे पुष्कळ आधार मिळाला आहे. सत्संग घेणार्या सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांच्या आवाजात तर मन मोहून घेणारी जादूच आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक वर्ष २०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |