‘कास महोत्सव’ : कारवाई कुणावर ?

कास महोत्सव

सातारा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या समन्वयाने कास येथील अटाळी गावी ‘कास महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले; मात्र त्याकडे सातारा जिल्हावासियांसोबतच पर्यटकांनीही पाठ फिरवली. मुळातच कास पुष्पपठार हे जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी गर्द झाडी, वन्य पशूपक्षी यांचा वावर असल्यामुळे कासचे एक वेगळे अस्तित्व आहे. कासचे पर्यटन वाढावे, अशी अपेक्षा असली, तरी वन्यजिवांच्या क्षेत्रामध्ये कोणताही मानवीय हस्तक्षेप असू नये. यामुळे कास पर्यटनाला सातारावासियांनी प्रचंड विरोध केला; मात्र तरीही ७० लाख रुपयांचा व्यय करत कास येथील शांतता भंग करण्याचे कृत्य जिल्हा प्रशासनाने केले. याविरुद्ध कुणावर कारवाई होणार का ? हा प्रश्न आहे.

कास महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने ३०० हून अधिक झाडांची कापणी केली. ज्या ठिकाणी पर्यटक वन्यजीवांचा विचार करून वाहनांचा हेडलाईटसुद्धा ‘लो’ करून वाहन चालवतात, तेथे ‘लेझर लाईट शो’ करून धिंगाणा घालण्यात आला. ‘कास महोत्सवा’साठी लागणारी वीज व्यासपिठाच्या मागून जाणार्‍या वीजवाहक तारांवर आकडा टाकून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. ‘कास महोत्सवा’साठी पर्यटनाची आवड असलेले शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती होती; मात्र महोत्सवाला वाढता विरोध आणि पर्यटकांविना मोकळ्या खुर्च्या मंत्री महोदय आल्यानंतर दिसल्या असत्या, तर सातारा जिल्हा प्रशासनाची मोठी नाचक्की झाली असती. त्यामुळे आयोजकांनी प्राथमिक शाळेच्या मुलांची गर्दी करून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना बळजोरीने जिल्हा प्रशासनाच्या दावणीला बांधणे कितपत योग्य आहे ? राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही महोत्सवाला येण्याचे टाळले.

‘‘कास महोत्सवा’ला झालेला विरोध पहाता लोकप्रतिनिधींनी महोत्सवाला न येता वेळीच हस्तक्षेप करून तो महोत्सव का थांबवला नाही ?’, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात येतो. नैसर्गिक सुबत्ता राखून ठेवल्यामुळे कास पुष्पपठार जागतिक वारसास्थळ आहे; मात्र अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील नैसर्गिक ठेव्याची विल्हेवाट लागणार असेल, तर याला उत्तरदायी असणारे सर्वच जण कठोर शिक्षेस पात्र आहेत, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ते काय ?

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा