ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही !

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक

ऋतुजा लटके

मुंबई – अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तिथे पोटनिवडणुका होणार आहेत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असून त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्या उमेदवारीत काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटाने दुसर्‍या उमेदवाराची सिद्धता केली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राजीनामा संमत करण्याचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना असतात, असा नियम आहे. १ मासाचे वेतन भरल्यावर १ मासाच्या आत राजीनामा संमत केला जाऊ शकतो, असा नियम असल्याचे ठाकरे गटाचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

श्रीमती लटके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मागील आठवड्यात भेट घेतल्याच्या चर्चाही आहेत; परंतु श्रीमती लटके यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या वृत्ताला खोटे असल्याचे सांगून त्या ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले आहे.

शिंदे गटाकडून श्रीमती लटके यांच्यावर दबाव असल्याचा ठाकरे गटाचे अनिल परब यांनी आरोप केला आहे, तर शिंदे गटाचे किरण पावसकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘कुठलाही दबाव सरकारच्या वतीने आणण्याचा प्रश्न नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार’, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. येथील भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे.