मद्यालयात दारू पिणार्‍या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोचवण्याचे दायित्व मद्यालय मालकाचे ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री, गोवा

गोव्यात सर्व रस्त्यांवर पुढील २ – ३ मासांत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणार

मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

पणजी, १० ऑक्टोबर (वार्ता.) – रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण उणावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; मात्र याला अपेक्षित यश आलेले नाही. यामुळे आता गोव्यातील सर्व रस्त्यांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, तसेच मद्यालयात दारू पिणार्‍या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोचवण्याचे दायित्व मद्यालय मालकाचे असेल. यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली. पर्वरी येथे १० ऑक्टोबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या वेळी मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व रस्त्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (‘पीपीपी’) तत्त्वावर हाती घेण्यात येणार आहे. हे कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर पर्वरीहून साळगावमार्गे जाणार्‍या रस्त्यावर बसवण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर यामुळे देखरेख ठेवता येणार आहे. ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांमुळे वाहनचालकांना नियमांचे पालन करणे भाग पडेल आणि रस्त्यांवरील अपघात उणावेल. मद्यपान करून वाहन चालवणे यावर आळा घालण्यासाठी यापुढे महत्त्वाच्या ठिकाणी थांबण्याऐवजी मद्यालय आणि पब यांच्या बाहेर आल्यानंतर वाहनचालकांची तपासणी केली जाईल.’’

गोव्यात लवकरच ‘मल्टीमॉडेल’ वाहतूक ॲप सेवा चालू करणार

पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी लवकरच ‘मल्टीमॉडेल’ वाहतूक ॲप सेवा चालू करणार आहे. सर्व टॅक्सीचालकांनी या ‘ॲप’मध्ये स्वतःची नोंदणी करावी.

सध्या ‘गोवा माईल्स’ ही चांगली सेवा बजावत असल्याने गोव्यात ‘ओला’ आणि ‘उबेर’ या ॲपवर आधारित टॅक्सीसेवांची आवश्यकता नाही, असे मंत्री मावीन गुदिन्हो म्हणाले.

दाबोली विमानतळावर येत्या आठवड्यापासून ‘गोवा माईल्स’ची टॅक्सीसेवा चालू होणार

पणजी – दाबोली विमानतळावर ‘गोवा माईल्स’ ही ‘ॲप’वर आधारित टॅक्सीसेवा पुढील आठवड्यापासून चालू होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री माविन गुदिन्हो यांनी २ दिवसांपूर्वी केली होती. ते म्हणाले होते, ‘‘ॲप’वर आधारित टॅक्सीसेवा चालू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला आहे. राज्य पर्यटन विभागाने ‘गोवा माईल्स’समवेत २५ वर्षांचा करार केला आहे. टॅक्सीचालक ‘गोवा माईल्स ॲप’द्वारे पुरवण्यात येणार्‍या सेवेत सहभागी होऊ शकतात. टॅक्सीचालक ‘ॲप’वर आधारित सेवेविषयी सहमत असले अथवा नसले, तरी मी पुढच्या आठवड्यापासून दाबोली येथे ही सेवा चालू करणार आहे. ‘ओला’ आणि ‘उबेर’ या आस्थापनांद्वारे चालवण्यात येणारी टॅक्सीसेवा आणण्याविषयी निर्णय नंतर घेतला जाईल.’’

दाबोली विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना ‘गोवा माईल्स’ आणि ‘प्रीपेड टॅक्सी’ (पैसे भरून टॅक्सीसेवा देणे) असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. ‘मोपा विमानतळ हे खासगी विमानतळ आहे.