कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे नवरात्रोत्सवानिमित्त युवावर्गासाठी शौर्यजागृती व्याख्यान
सिंधुदुर्ग – धर्मपालन आणि संस्कृती यांचे पालन केल्यासच धर्मरक्षण होईल. यासाठी आपण धर्मशिक्षण घ्यायला हवे, तरच आपल्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्याची प्रेरणा निर्माण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी कुडाळ येथे आयोजित शौर्यजागृती व्याख्यानात केले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवावर्गासाठी येथे शौर्यजागृती व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये त्यांनी धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राखी पांगम यांनी केले.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण अंगीकारणारी युवा पिढी हवी आहे. हिंदूंना हिंदु म्हणून सन्मानाने जगायचे असेल, हिंदु स्त्रियांना सन्मानाने जगायचे असेल, तर हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीमातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्याला ईश्वरी अधिष्ठान मिळवून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी भक्तीभावाने शक्तीची उपासना करा.’’
आपत्काळात तरण्यासाठी साधना करून भगवंताचे भक्त बनूया ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
आपण धर्म आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये धर्मप्रेम निर्माण होत नाही. धर्माचरण केले, तरच धर्मावरील प्रेम वाढते. हिंदु धर्मावरील आघात परतवून लावण्याचे बळ आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. शारीरिक बळ वाढवण्यासाठी प्राणायाम, योगासने, व्यायाम करणे आणि मानसिक बळ निर्माण करण्यासाठी क्रांतीकारकांची चरित्रे वाचणे, धर्मग्रंथांचे वाचन करणे यांसारख्या कृती करायला पाहिजेत. आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. कलियुगातील साधना म्हणजे नामस्मरण ! आपल्याला ‘जन्ममृत्यूच्या फेर्यातून’, ‘पापातून मुक्त करतो’, तो म्हणजे जप ! आपण सर्वांनी कुलदेवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्तगुरूंचा नामजप करूया. येणारा काळ कितीही कठीण असला, तरी आपण साधना केली, तर भगवंत आपले रक्षण करणारच आहे. त्यामुळे आपण साधना करून भगवंताचे भक्त बनण्यासाठी प्रयत्न करूया.
क्षणचित्र : व्याख्यानाचा विषय ऐकून प्रभावित होऊन उपस्थित युवावर्गाने उत्स्फूर्तपणे ‘हर हर महादेव’ असा जयघोष केला.