मुंबई – शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाविषयी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर देण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण या चिन्हाविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण या चिन्हाविषयी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ८०० पानांचे उत्तर निवडणूक आयोगाला सादर केले होते. यामध्ये पक्षातील फुटीविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबर या दिवशी शिवसेनेने निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाविषयी दावा सादर केला आहे. या वेळी शिवसेनेच्या अधिवक्त्याने सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याशिवाय अडीच लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्रे दिली असून आता लवकरच १० ते १२ लाख पक्ष सदस्य नोंदणी आयोगासमोर सादर करणार आहोत.
अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि निवडणूक चिन्हासाठी देण्यात येणारा अर्ज देण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे.