कृतघ्नपणा !

कुठे सावरकर आणि कुठे आपल्या मातृभूमीला सोडून जाणारे युवक ? यांना कृतघ्न का म्हणू नये ?

भारत सोडणार्‍या लोकांची संख्या सध्या वाढत आहे. या वर्षी १ कोटी २० लाख भारतियांनी भारतीय नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. बॅरिस्टर असूनही भारतात अनुकूल परिस्थिती नसतांनाही भारताला स्वतंत्र करण्यासाठी मायभूमीची सेवा करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर भारतात परतले. मायभूमीच्या आठवणीत तळमळत असतांना त्यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे महान गीत म्हणून आपल्या जन्मभूमीला आळवले आणि थोड्या असुविधा आहेत किंवा नोकरीत अपेक्षेपेक्षा अल्प वेतन आहे; म्हणून भारताचे नागरिकत्व सोडणार्‍या या युवांना काय म्हणावे ? कुठे सावरकर आणि कुठे आपल्या मातृभूमीला सोडून जाणारे युवक ? यांना कृतघ्न का म्हणू नये ? असेच कुणालाही वाटेल.

‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’, म्हणजे स्वर्गापेक्षाही जन्मभूमी महान आहे. अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती महान आहे. दुर्दैवाने ही शिकवण आपण विसरत चाललो आहोत. बहुतांश भारतीय जे देश सोडून स्थलांतरित होत आहेत, ते अधिक चांगली जीवनशैली जगता यावी यासाठीच ! खरे पाहिले, तर सर्वांत आदर्श जीवनशैली ही ‘भारतीय जीवनशैली’ आहे. तिचे अनुकरण स्वतः विदेशी लोक करत आहेत. विदेशातील लोक मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी भारतातील आध्यात्मिक ऊर्जा असलेल्या संतांच्या आश्रमात येत आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, व्यावसायिक, उद्योगपती यांचाही समावेश आहे.

विदेशात रहाणार्‍या भारतीय लोकांवर तेथील लोक द्वेषमूलक टीका करत आहेत  त्यांना ‘परत भारतात जा’, असे सांगत आहेत. यात दोष कुणाचा आहे ? स्वतःचा अपमान करून घ्यायला आपण इतर देशात का जातो ? आणि नंतर आपण साहाय्यासाठी भारत सरकारकडून अपेक्षा करतो. येथे देशाभिमान कसा असायला हवा, यासाठी जपानचे उदाहरण समोर ठेवायला हवे. अणूबाँबच्या आक्रमणातून सावरत, तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती अंगावर घेत, या राष्ट्राने विकसित देशांच्या सूचीत आपले स्थान निर्माण केले. अणूबाँबच्या आक्रमणानंतर त्यांनी पुढे अनेक वर्षे अमेरिकेकडून टाचणीही विकत घेतली नाही. इतके स्वतःला स्वावलंबी बनवले. तेथील प्रत्येक नागरिकाने देशाच्या उभारणीमध्ये स्वतः दायित्व घेतले. देशामध्ये रहाणार्‍या प्रत्येकाला आपल्या मायभूमीविषयी आत्मीयता वाटायला हवी. देश विकसित होणार तो देशातील नागरिकांच्या कष्टामुळेच. यासाठी युवा पिढीला राष्ट्रभक्तीचे धडे शाळांमधून दिले, तर हे शक्य आहे.

– श्री. जयेश बोरसे, पुणे