शिवचरित्राच्या पारायणातून सुवर्ण भारताचा ध्यास लागेल आणि त्यातून भारत समृद्ध होईल ! – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास अभ्यासक

तळेगाव (जिल्हा पुणे) – शिवचरित्राच्या पारायणातून, इतिहासातून सुवर्ण भारताचा ध्यास लागेल आणि त्यातून भारत समृद्ध होईल, असे मत इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यापासून प्रेरणा घेत नवी पिढी राष्ट्रप्रेमी, कर्तृत्ववान घडावी या उद्देशाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवशाही परिवाराच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे शिवचरित्राचे ७ दिवस पारायण करण्यात आले. बोराडे यांच्या ‘राजगुराव कॉलनी’मधील शिवशाही निवास येथे आयोजित या शिवचरित्र पारायणाची नुकतीच सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिवचरित्रातून राष्ट्रासमोरील आव्हानांना कसे तोंड द्यावे ? हे समजावून देतांनाच स्वतंत्र भारताचे खरे नायक कोण ? याचा परिचयही मुलांना झाला.