१८६३ मध्ये कोलकाता (बंगाल) येथे ‘ब्रिटीश मेडिकल असोसिएशन’ची स्थापना झाली आणि डॉ. महेंद्रलाल सरकार हे पहिले सचिव म्हणून काम पाहू लागले. सरकार यांचा व्यवसाय आणि स्वतःची कार्यकुशलता तेजीत होती. बंगालमधील अनेक नामी असामी त्यांचे रुग्ण होते. त्यांना स्वतःच्या कार्यकुशलतेविषयी गर्व तर होताच; पण इतर वैद्यकीय शाखांनाही ते फारसे मानत नसत. असोसिएशनच्या पहिल्याच सभेत त्यांनी होमिओपॅथीवर सडकून टीका केल्याने त्यांची पुष्कळ वाहवाह झाली.
एका रुग्णाला होमिओपॅथीच्या औषधाने बरे वाटणे आणि डॉ. सरकार यांनी त्याविषयी अभ्यासपूर्ण भाषण केल्याने त्यांना ब्रिटिशांनी निलंबित करणे
मात्र दैवयोग कसा असतो, ते पहा. त्यांच्या उपचाराने फरक न पडलेल्या एका रुग्णाला होमिओपॅथीच्या उपचाराने गुण आला. हे कळताच त्यांच्या अहंकाराला धक्का लागला; मात्र ते एक प्रामाणिक अभ्यासक असल्याने त्यांनी या पॅथीचा अभ्यास चालू केला. डॉ. सरकार यांना त्याचे महत्त्व लक्षात आल्यावर त्यांनी पुढील सभेत या पॅथीविषयी अभ्यासपूर्ण भाषण केले. ॲलोपॅथीच्या अहंगंडाने पछाडलेल्या ब्रिटिशांनी मात्र हे भाषण ऐकताच त्यांना असोसिएशनमधून निलंबित केले !
डॉ. सरकार यांनी चालू केलेल्या मासिकातील पहिल्या संपादकीयमध्ये आचार्य चरक यांची सूत्रे वापरणे
असे झाले, तरी डॉ. सरकार मात्र डगमगले नाहीत. त्यांनी जोमाने होमिओपॅथी प्रॅक्टिस (व्यवसाय) चालू केली आणि तिथेही यशस्वी झाले. पुढे वर्ष १८७० मध्ये त्यांनी ‘कलकत्ता मेडिकल जर्नल’ चालू केले आणि त्याच्या पहिल्याच संपादकीयमध्ये थेट आचार्य चरक यांची सूत्रे संदर्भ म्हणून वापरली ! (संदर्भ : मासिक ‘विज्ञान विश्व’)
विज्ञानवाद्यांकडून अपेक्षा !
देश पारतंत्र्यात असतांनाही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून हा खडतर प्रवास डॉ. सरकार यांनी पार पाडला हे विशेष ! विज्ञानाचा भारतीय प्रवास आणि भारतीय विज्ञानाचा प्रवास हे दोन्ही मोठे रोचक विषय आहेत.
डॉ. सरकार यांच्याप्रमाणेच जिज्ञासू वृत्तीने आपल्याला कळत नसलेल्या आयुर्वेद, योग आदी भारतीय शास्त्रांचा अभ्यास खर्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारे विज्ञानप्रेमी करतील ही अपेक्षा; कारण विज्ञानांधळे तर या शास्त्रांच्या द्वेषाने ग्रस्त असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे बैलाकडून दूध मिळण्याची आशा ठेवण्यासारखे आहे. एक वेळ विज्ञानाला तेही साध्य होईल; पण…
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली