कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळुरू येथे पत्रकार परिषद

मंगळुरू (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीने द्विदशकपूर्ती केल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशात हिंदु समाजाच्या मनात हिंदु राष्ट्र संकल्प दृढ करण्यासाठी आणि हिंदु समाजाला हिंदु राष्ट्रासाठी सक्रीय करण्याच्या दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू करण्यात आले आहे. या संदर्भात समितीकडून येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती देण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, भाजपचे वाणिज्य आणि व्यापार शाखेचे दक्षिण कन्नड जिल्हा सहसंचालक श्री. दिनेशकुमार जैन आणि समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा हे उपस्थित होते. या वेळी कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे’’, अशी मागणी श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी केली.

श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले, ‘‘गेल्या २० वर्षांपासून निरंतर केलेल्या जागृतीमुळे राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी हिंदू सक्रीय झालेले दिसून येत आहेत. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारावर समितीकडून वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. हे सर्व ईश्वराची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांच्या सक्रीय सहभागामुळे घडत आहे.’’