बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर बांधली मजार

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे)

महान मौर्य सम्राट अशोक यांचा शिलालेख (डावीकडे ) आणि त्यावर बांधलेली मजार (उजवीकडे )

सासाराम (बिहार) – येथील रोहतास जिल्ह्यातील चंदन टेकडीवर महान मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखावर मजार बांधण्यात आली आहे. देशभरात सम्राट अशोकाचे ६ ते ८ शिलालेख आहेत, त्यांपैकी केवळ एकच बिहारमध्ये आहे. या शिलालेखावर मजार उभारून आता चादर चढवली जाते.

एकेकाळी अखंड भारतावर (काबुल ते कन्याकुमारी) राज्य करणार्‍या सम्राट अशोकाचे २ सहस्र ३०० वर्षे जुने शिलालेख नष्ट केले जात आहेत. २ सहस्र ३०० वर्षे जुना वारसा अवघ्या २३ वर्षांत पुसला गेला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला चंदन टेकडीवर चालू असलेली बांधकामे अवैध असून तेथील पूर्वस्थिती कायम ठेवण्यासाठी पत्रे लिहिली होती. वर्ष २००८ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार सम्राट अशोक शिलालेखाजवळील अतिक्रमण हटवण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सासाराम उपजिल्हाधिकार्‍यांना दिला होता. तत्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांनी मरकजी मोहरम समितीला कबरीची चावी प्रशासनाकडे सोपवण्याची सूचना केली होती; मात्र समितीने आदेशाचे पालन केले नाही. सध्या तेथे मोठी इमारत बांधण्यात आली आहे. (या ऐतिहासिक वारसास्थळी अवैध बांधकाम होण्यास उत्तरदायी असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. यासह हे अवैध बांधकाम तातडीने हटवावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !