पुण्याच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांसह २ पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश !

मोरगाव येथील ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’ भूमी खरेदी-विक्री अपव्यवहार प्रकरण

पुणे – अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’ भूमी खरेदी-विक्री अपव्यवहाराच्या प्रकरणी पुण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्यासह २ पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे हे खरेदीदार आणि गुन्ह्यात सहभागी असतांनाही हेतूपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. पोलिसांनी तावरे यांना ३ गुन्ह्यांतून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच दौंड न्यायालयाने शिरगावकर यांच्यासह यवतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि तावरे यांच्यावर गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

या प्रकरणी पोपट तावरे यांची किरण भोसले आणि आरती लव्हटे यांनी यवत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यांना ‘क्लीन चीट’ दिली होती आणि ‘या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही’, असे न्यायालयाला दर्शवले होते. याविषयी तक्रारदाराने न्यायालयात दाद मागितली होती.

संपादकीय भूमिका

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस ! स्वतः भ्रष्ट असणारे पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल.