नागपूर येथे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन !

नागपूर येथे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात २८ सप्टेंबर या दिवशी येथील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर सरस्वतीदेवीच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आंदोलन केले.

२ दिवसांपूर्वी भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना शाळेत होत असलेल्या सरस्वतीपूजनाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर समाजातील हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे ते हिंदु समाजाचे मन दुखावेल, असे वक्तव्य करत आहेत. सरस्वतीपूजन करण्यात आले आहे. आम्ही या माध्यमातून ‘छगन भुजबळ यांना सद्बुद्धी मिळो’, अशी सरस्वतीदेवीकडे प्रार्थना करतो’, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.