केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांच्या हानीभरपाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

‘पी.एफ्.आय.’ने बंदच्या वेळी बसगाड्यांची तोडफोड केल्याचे प्रकरण

थिरुवनंतपूरम् (केरळ) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली. ‘पी.एफ.आय.’ने ही हानीभरपाई द्यावी, अशी मागणी करणारी एक याचिका केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) देशभरातील ‘पी.एफ्.आय.’च्या ठिकाणांवर धाडी टाकून त्याच्या नेत्यांना अटक केली होती. या अटकेच्या निषेधार्थ ‘पी.एफ्.आय.’ने राज्यव्यापी बंद पुकारला होता. या वेळी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात बसगाड्या आणि इतर सार्वजनिक मालमत्ता यांची मोठी हानी झाली होती. या प्रकरणी अधिवक्ता दीपू टंकन यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेत केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दावा केला आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंद पुकारण्यात आला होता. असा बंद पुकारणे, हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे.