सकल हिंदु समाजाच्या वतीने पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात महाआरती !

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेच्या मागणीसाठी सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

पुणे – ‘गर्व से कहो हम हिंदु है’ ‘आय सपोर्ट राजाभैय्या’ (मी राजासिंह यांना समर्थन देतो.) अशा घोषणांनी २४ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर येथील वातावरण हिंदुत्वमय झाले होते. मंदिरात भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांच्या सुटकेसाठी सायंकाळी ७ वाजता गणपतीची महाआरती करण्यात आली. सकल हिंदु समाजाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याच्या प्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने जामीन दिला होता; मात्र तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात अटक करून त्रास देण्याचा प्रकार चालवला आहे. त्यांची कारागृहातून सुटका व्हावी, त्यांना संरक्षण देण्यात यावे या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘राजाभैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. या वेळी एका बाजूला ‘जय गणेश’ आणि दुसर्‍या बाजूला ‘आय सपोर्ट राजाभैय्या’ असे लिहिलेली टोपी, तसेच हातात भगवे झेंडे आणि राजाभाई यांचे भित्तीपत्रक घेऊन सहस्रोंच्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.