कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात २०० रुपये आकारून सशुल्क ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार आहे.
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांच्या नियमित रांगेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अनुमती देण्यात येऊ नये, तसेच तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने मूल्य आकारून दर्शनासाठी प्रवेश देऊ नये’, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना ७ सप्टेंबर २०१० या दिवशी सरकारने घोषित केल्या होत्या. या संदर्भातील पत्र देऊनही विचार न झाल्याने श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.