गोवा : गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी आणि वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २१ सप्टेंबर (वार्ता.) – तिस्क-उसगाव येथे कॅनरा आणि ‘एच्.डी.एफ्.सी.’ या बँकांची ‘ए.टी.एम्.’ यंत्रे फोडण्यामध्ये बांगलादेशी टोळी सक्रीय असल्याचे अन्वेषणात उघड झालेले असतांनाच गोव्यात अनेक वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. केंद्रातील आतंकवादविरोधी पथकाला (ए.टी.एस्.) माहिती मिळाल्यानंतर पथकाने २० सप्टेंबर या दिवशी बोर्डे, डिचोली आणि प्रतापनगर, हरवळे येथे कारवाई करत ५ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेतले, तर ५ सदस्य असलेल्या बांगलादेशी घुसखोर कुटुंबाला स्थानबद्ध केले. गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी, वाळपई आदी परिसरात बांगलादेशी घुसखोर बिनधिक्तपणे रहात असल्याचे उघड झाले आहे. प्लास्टिक आणि भंगार गोळा करण्याचा बहाणा करून हे घुसखोर स्थानिकांच्या खोल्यांमध्ये भाड्याने रहातात; मात्र स्थानिक पोलिसांना याची पुसटशी कल्पनाही कशी नसते ? असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. (यांना स्थानिक मुसलमान किंवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या आतंकवाद्यांशी संबंध असलेली संघटना साहाय्य करत आहेत का ? याचेही अन्वेषण पोलिसांनी करावे ! – संपादक)

२० सप्टेंबर या दिवशी बोर्डे, डिचोली येथील पळ नावाच्या एका व्यक्तीच्या भूमीत वास्तव्य करून परिसरातील भंगार गोळा करण्याचे काम करणारे सर्व जण बांगलादेश येथील राजापूर बाजार या भागातील आहेत. अशाच प्रकारे प्रतापनगर, हरवळे येथे स्थानबद्ध केलेले कुटुंब गेल्या २ वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. (हिंदूंनो, आपल्या परिसरात असे अनोळखी कुणी रहात असल्यास त्याविषयी तात्काळ पोलिसांना संपर्क करा ! – संपादक)

बांगलादेशी घुसखोरांकडे सापडले भारतीय आधार कार्ड

बोर्डे, डिचोली येथे कह्यात घेतलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय आधार कार्ड सापडले आहे. या आधार कार्डच्या आधारे हे घुसखोर गोव्यात सर्वत्र भ्रमंती आणि वास्तव्य करत आहेत. कह्यात घेतलेला अन्वर हसन हा २ वर्षांतून एकदा बांगलादेशला भेट देतो. हसन चांद नियान याने ४ वर्षांपूर्वी बांगलादेशला भेट दिली होती. (स्थानिक राष्ट्रद्रोही मुसलमानांचे साहाय्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या गोष्टीच बांगलादेशींकडे आधार कार्ड असण्यास कारणीभूत आहेत ! – संपादक)

गोव्यातील बांगलादेशी घुसखोरांचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावे ! – नितीन फळदेसाई, राज्य प्रमुख, राष्ट्रीय बजरंग दल

श्री. नितीन फळदेसाई

बांगलादेशी घुसखोरांचे गोव्यात येऊन येथील ‘ए.टी.एम्.’ यंत्र फोडण्याचे धाडस होते कसे ? त्यांना कुणाचा पाठिंबा आहे ? यामागे एखादी राजकीय व्यक्ती आहे का ? बांगलादेशी नागरिकांना गोव्यात प्रवेश कसा मिळतो ? ते गोव्यात कुठून आले ? किती काळ गोव्यात वास्तव्यास आहेत ? हे आतंकवादी नाहीत ना ? ‘ए.टी.एम्.’ यंत्रे फोडून त्या पैशांचे त्यांनी काय केले ? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा राज्य प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली आहे.

गुन्हेगारीमध्ये बांगलादेशी टोळी सक्रीय

हल्लीच तिस्क-उसगाव येथे २ बँकांची ‘ए.टी.एम्.’ यंत्रे फोडून आतील पैसे चोरल्या प्रकरणी २ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. आंधप्रदेश पोलिसांनी अन्य एका गुन्ह्यामध्ये बांगलादेशी टोळीतील दोघांना कह्यात घेतले. ‘ए.टी.एम्.’ यंत्रे फोडल्याच्या प्रकरणी अजूनही काही जण पसार आहेत. तसेल हल्ली फोंडा तालुक्यात महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. फोंडा तालुक्यात मागील २ मासांत असे ५ प्रकार घडले आहेत; मात्र अद्याप पोलिसांनी कुणालाही कह्यात घेतलेले नाही. असे प्रकार कमी-अधिक फरकाने गोवाभर होत आहेत. राज्यात यापूर्वी गुन्हेगारीमध्ये इराणी टोळी कार्यरत होती. आता बांगलादेशी टोळी सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !