राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व, तर काँग्रेसची पिछेहाट !

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५ पर्यंत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११८ पर्यंत ग्रामपंचायती कह्यात घेता आल्या आहेत. एकूणच राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या निवडणुकीत वर्चस्व राखले आहे; परंतु मागच्या जागांच्या तुलनेत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला ४३ पर्यंत, शिवसेनेच्या शिंदे गट २८ पर्यंत, तर उद्धव ठाकरे यांचा गट २० पर्यंत ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करू शकले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी चालू असल्यामुळे निवडणुकीच्या आकड्यांत आणखी पालट होण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वत:चे वर्चस्व राखण्यात यश आले आहे. नाशिकमध्ये ८८ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली. पुणे येथे ६१ पैकी ३०, नगर येथे ४५ पैकी २० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे.

धुळे येथे भाजपचे निर्विवाद वर्चस्व !

धुळे येथील ३३ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली. केवळ १ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कह्यात गेली. नंदुरबारमध्ये ७५ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. राज्यातील भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्रितपणे १५३, तर महाविकास आघाडीने १८१ ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे.


अमरावती येथे काँग्रेस आणि भाजप यांची बाजी  !

अमरावती – जिल्ह्यात एकूण ५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचायतींत काँग्रेसने बाजी मारली, तर चांदूर तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी मारली आहे. धारणी तालुक्यात हरिसल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली.