पुण्यातील निर्बंधमुक्त मिरवणूक, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, मंडळांवर कारवाई यांविषयी हलगर्जीपणा याविषयी पोलिसांना पुणेकरांकडून नोटीस !

पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना ‘गुलाब फुल’ देत निषेध !

पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना गुलाबाचे फुल देऊन निषेध व्यक्त करतांना

पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला अधिक वेळ, ढोल-ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे केलेले दुर्लक्ष, मिरवणुकीतील कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश, अमर्याद ध्वनीक्षेपकांचा वापर, प्रखर प्रकाशझोत टाकणार्‍या दिव्यांचा वापर अशा अनेक तक्रारींची नोटीस पुणेकरांच्या गटाने पोलीस आयुक्तांना दिली आहे. या वेळी पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना गुलाबाचे फुल देऊन निषेधही व्यक्त करण्यात आला.

राजकीय दबावामुळे गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आले, अशा आशयाची नोटीस देऊन त्याचे ७ दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास उच्च न्यायालयात जाण्याची चेतावणीही पुणेकरांच्या गटाकडून देण्यात आली आहे.