कोणत्याही व्यक्तीच्या निधनावर जसे दु:ख होते, तसेच दु:ख राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर प्रत्येक भारतियाला होणे, येथपर्यंत ठीक आहे; परंतु ‘पाश्चात्त्यांचे सर्व काही थोर’ असाच कुसंस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्हाला १५० वर्षे गुलामीत ठेवणार्या ब्रिटनच्या राजघराण्यातील राणीचा मृत्यू हा जणू भारतातील कुणी मोठी व्यक्ती गेल्याप्रमाणे काही जणांसाठी दुःखदायक झाला आहे ! ब्रिटनच्या राणीसाठी तेथे कशा प्रकारे दु:ख व्यक्त केले जात आहे, त्यासाठी नाना प्रकारे काय काय केले जात आहे, जगातील या प्रतिष्ठित म्हणून समजल्या जाणार्या राजघराण्याचा इतिहास यांविषयी ‘बीबीसी’, ‘द गार्डियन’ यांसारख्या ब्रिटीश वृत्तवाहिन्या अन् वृत्तपत्रे यांमध्ये येणे साहजिक आहे; एकवेळ ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘हफपोस्ट’ यांसारख्या अमेरिकी माध्यमांनीही हा विषय मोठ्या प्रमाणात हाताळणे समजू शकतो; परंतु त्याच तीव्रतेने भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये हा विषय हाताळण्यामध्ये जी चढाओढ चालू आहे, ती सयुक्तिक आहे का ? जगातील एका प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्वाच्या प्रदीर्घ युगाचा अंत झाला. त्या निमित्ताने त्या व्यक्तीमत्त्वाच्या जीवनाविषयी जागतिक स्तरावर, तसेच भारतात काही प्रमाणात चर्चा होण्याला आडकाठी नाही; किंबहुना माहिती या दृष्टीने ते योग्यही आहे; परंतु गेल्या २ दिवसांपासून भारतीय प्रसारमाध्यमांकडून ‘टीआरपी’च्या नादामध्ये जे चालू आहे, ते अनाकलनीय आहे. ‘अभिनेत्री सुष्मिता सेन यांना राणीच्या निधनावर नेमके कशामुळे दु:ख झाले ?’, ‘राणीला ब्रिटनच्या सर्व हालचालींविषयी दिला जाणारा आढावा’, ‘राणीची अंत्ययात्रा बकिंघम पॅलेसपासून कोणत्या मार्गाने मार्गस्थ होणार आहे ?’, ‘आता राजे झालेले प्रिंस चार्ल्स यांच्या प्रथम भाषणाचे थेट प्रक्षेपण’ यांसारख्या अनेक गोष्टींची वृत्ते सध्या झळकत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रसारमाध्यमांना एखाद्या मोठ्या विदेशी व्यक्तीविषयी प्रथमच असा विषय चघळायला मिळाला, हेही खरे. गेल्या ३-४ पिढ्यांत अशा प्रकारचा विषय एवढ्या चर्चेत येण्याचे तसे कारणही नव्हते; कारण वर्ष १९५२ ते आजतागायत ब्रिटनच्या सर्वाेच्च व्यक्तीचा मान राणी एलिझाबेथ यांनीच भूषवला होता. ९६ व्या वर्षी मृत पावलेल्या या राणीच्या पार्थिवावर ख्रिस्ती पद्धतीने १० दिवसांनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर आपल्या प्रसारमाध्यमांकडून या विषयाचे चर्वितचर्वण चालूच राहील, यात शंका नाही !
अनावश्यक इंग्रजीकरण !
ब्रिटनच्या राणीच्या निधनाच्या वृत्ताची भारतात अतीचर्चा ही भारताच्या, पर्यायाने हिंदूंच्या बौद्धिक दास्यत्वाचे प्रतीक होय. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; परंतु काळ सोकावतो’ या म्हणीनुसार अशा वार्तांकनातून ब्रिटीश राजघराण्याकडे ‘आदर्श’ म्हणून पहाण्याचा विचार नव्या पिढीतील भारतियांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रकारे मोगल आक्रमणकर्त्यांची वंशावळ तरुण, तसेच मध्यमवयीन भारतियांना तोंडपाठ असते, तशी ब्रिटनचे राजघराणे पाठ करण्याचे प्रयत्न होतील. येथे गंमत अशी आहे की, आज ब्रिटनमधील अनेक जण या राजेशाहीला विरोध करतात. ब्रिटीश सरकारने तेथे या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली. ‘यू गोव्ह’ या तेथील सरकारी संकेतस्थळावर मे २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी मांडण्यात आली आहे. तेथील साधारण ३० टक्के नागरिकांचा तेथील ‘मोनार्क डेमोक्रसी’ म्हणजे राजेशाही जपणार्या लोकशाही व्यवस्थेला विरोध आहे. हे प्रमाण काही लाखांमध्ये आहे. असे असतांना भारतियांनी या राजघराण्याला डोक्यावर घेण्याचे कारणच काय ? त्यातच भारत सरकार राणीच्या मृत्यूसाठी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करून मोकळे झाले आहे. खरेतर या मृत्यूचा भारताशी दुरान्वयानेही संबंध नाही. ‘भारताने तर दुराग्रह बाळगून या घटनेवर तटस्थ रहाणे आवश्यक आहे’, असेही काही कट्टर भारतीय म्हणत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारतियांच्या अनावश्यक इंग्रजीकरणास खतपाणी मिळणार आहे. समाजाच्या वैचारिक अभिसरणात सूक्ष्मत्वाने जे पालट घडत जातात, ते असेच !
ब्रिटनचा वंशवाद !
आज ब्रिटीश राजघराण्यावर तेथील सरकारी तिजोरीतून होणारा वार्षिक खर्च ११ सहस्र कोटी रुपयांच्या घरात आहे. सामान्य ब्रिटीश नागरिकाच्या खिशातूनच हे राजघराणे पोसले जात आहे, असा याचा सरळ अर्थ होतो. भारतातील अल्पसंख्यांकांच्या विरोधात खुट्ट झाले, तरी ‘भारतीय लोकशाहीची हत्या केली जात आहे’, असा गळा काही महाभाग काढतात. यांना ब्रिटीश राजघराण्यावर जनतेच्या पैशातून केला जाणारा हा अवाढव्य खर्च पाहून ‘आधुनिक लोकशाही व्यवस्थेची जनक असणार्या ब्रिटन’मधील लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असे का वाटत नाही ? भारतामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे वाहू लागले आहेत. भारताच्या परंपरा, गौरवशाली इतिहास आदींचे पुनर्जागरण होत असतांना काही पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आणि राजकारणी त्याकडे पाहून नाके मुरडत आहेत अन् त्याला मिळेल त्या व्यासपिठावरून विरोध करत आहेत; परंतु ब्रिटनमधील या जुन्या शाही परंपरेचा एवढा उदोउदो करण्याचे कारण काय ?, यावर कुणी चकार बोलायलाही सिद्ध नाही. आमच्या सामाजिक रचनेला जातीव्यवस्थेच्या नावाखाली भेदभावयुक्त म्हणत हिणवले जाते; प्रत्यक्षात आमच्याकडे एक आदिवासी महिला, मागासवर्गीय किंवा मुसलमानही राष्ट्रपती होऊ शकतात. त्यामुळे वंशवाद किंवा भेदभाव आमच्याकडे नाही; मात्र ब्रिटनमध्ये तो आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजेच हे शाही राजघराणे नव्हे का ? त्यामुळे राणीच्या निधनाचे उदात्तीकरण न करता काळाला अनुसरून आज भारतीय हिंदूंनी ब्रिटन आणि पर्यायाने पश्चिमी जगताला या प्रश्नांवरून आरसा दाखवायला हवा अन् त्यांचा दुटप्पीपणा उघडा पाडायला हवा !
भारतीय लोकशाहीला नावे ठेवणारे महाभाग वंशवादास खतपाणी घालणार्या ब्रिटनमधील लोकशाही व्यवस्थेवर गप्प का ? |