भीमा नदीवर नवीन पुलासह २० रस्ते सिद्ध होणार
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक येतात. त्यासाठी शहराचा नवीन विकास आराखडा सिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शेगाव दुमाला ते गोपाळपूर असा नवीन सिमेंटचा पूल, शहरात नवीन २० रस्ते, पालखी तळासाठी स्वतंत्र जागा, नदी घाटाचे सुशोभिकरण यांसह अन्य कामांचा समावेश असणार आहे. या कामांचा प्रारूप आराखडा सिद्ध करण्यात आला असून त्याविषयी मंदिर समितीचे अध्यक्ष, वारकरी यांच्या सूचना घेऊन आवश्यक कामांचा समावेश करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून १ सहस्र कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा सिद्ध करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पंढरपूर शहरातील रस्त्यांची रुंदी न्यून आहे. त्यामुळे नवीन २० रस्ते करण्यात येणार आहेत. वारकर्यांना थांबण्यासाठी ‘६५ एकरसारखे’ आणखी ठिकाणी नव्याने ३ पालखी तळ निर्माण करण्यात येणार आहेत. ‘नमामि चंद्रभागा प्राधिकरणा’च्या वतीने नदीमध्ये होणारे प्रदूषण न्यून करण्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात येणार आहे.