संभाजीनगर – शहरातील एक पोलीस ठाणे उडवण्याची धमकी देणारा तरुण शुभम काळे (वय २३ वर्षे) याला गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडी परिसरातून १ सप्टेंबर या दिवशी अटक केली. केवळ ‘टाईमपास’ म्हणून त्याने एकदा, दोनदा नव्हे, तर तब्बल ४ वेळा दूरभाष करून पोलिसांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. (चार-चार वेळा धमकी देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवणार्यांना कठोर शिक्षा दिली जात नाही, हे आश्चर्य ! – संपादक) पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्षातील कर्मचारी अरविंद मेने हे २८ ऑगस्ट या दिवशी कर्तव्यावर असतांना त्यांना शुभम काळे याने ११२ क्रमांकावर दूरभाष करून ‘मी शहरातील एक पोलीस ठाणे उडवणार आहे’, अशी धमकी दिली. प्रथम पोलिसांनी त्याच्या दूरभाषकडे दुर्लक्ष केले; मात्र त्याने ४ वेळा दूरभाष केल्याने पोलीस दल सक्रीय झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून सतर्क झालेल्या पोलिसांनी याची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण करून काळे याला अटक केली.