श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुणे येथे पाचव्या दिवसापासून फिरते हौद !

नागरिकांच्या सोयीपेक्षा केवळ निविदा मान्यतेसाठीच प्रशासक आग्रही

पुणे – कोरोनाचे निर्बंध नसतांनाही महापालिका प्रशासनाने यंदा १५० फिरत्या हौदांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये ‘सिद्धी ॲडव्हर्टायझिंग’ या ठेकेदार आस्थापनाचे ४.९९ टक्के अशी वाढीव दराने आलेली १ कोटी ४१ लाख रुपयांची निविदा मान्य केली आहे. हे फिरते हौद पाचव्या दिवसापासून उपलब्ध होणार आहेत. १५० फिरत्या हौदांसाठी ५ दिवसांसाठी प्रत्येकी ९४ सहस्र रुपये महापालिका मोजणार आहे, तर एका दिवसासाठी १८ सहस्र ८०० रुपये भाडे असणार आहे. यामध्ये नागरिकांच्या सोयीपेक्षा केवळ निविदा मान्यतेसाठीच प्रशासक आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घनकचरा विभागासह प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांनी निविदा काढली होती. यामध्ये पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत फिरते हौद शहरामध्ये होते; पण ठेकेदाराने हे फिरते हौद जागेवरच थांबवून ठेवले. त्यामुळे दीड दिवस, तीन दिवसाच्या नागरिकांसाठी फिरते हौद उपलब्ध झाले नाहीत; पण महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सर्व भागांत गाड्या फिरवत असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या गाड्या जागेवर असल्याचे समोर आले. नदीकाठचे हौद चालू केले, तर नदीमध्ये विसर्जनाचे प्रमाण वाढेल, त्यातून नदीचे प्रदूषण होईल. नदीकाठच्या हौदाऐवजी शहरात ठिकठिकाणी लोखंडी टाक्यांत विसर्जनाची सोय केली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. (पाण्यात मूर्ती विसर्जित केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, हे अनेक वेळा प्रयोगातून सिद्ध करण्यात आले आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका 

हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे बुजवण्यासाठी, विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात, हा अनुभव आहे. शासनाने हे श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्यासाठी, तसेच कृत्रिम हौद बनवण्यासाठी व्यय करण्यापेक्षा गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार विसर्जित करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.