पंजाबच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीची तोडफोड

पाद्य्राच्या गाडीची जाळपोळ !

अमृतसर (पंजाब) – पंजाबमधील तरनतारन शहरातील चर्चमध्ये तोडफोड करण्यात आली. ३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्‍या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली. चर्चमध्ये घुसण्यापूर्वी येथील सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे हात बांधण्यात आले होते. या तोडफोडीच्या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती आहे. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी ख्रिस्त्यांनी पट्टी-खेमकरण राज्य मार्ग बंद केला. आरोपींना अटक करण्याची मागणी ख्रिस्त्यांनी करत धरणे आंदोलन चालू केले आहे. या घटनेच्या २ दिवस आधी दादुआना गावात चालू असलेला ख्रिस्त्यांचा एक कार्यक्रम निहंग (सशस्त्रधारी) शिखांनी बंद पाडला होता. त्यांनी तेथे तोडफोडही केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १५० निहंग शिखांवर गुन्हा नोंदवला होता.

पाद्य्रांकडून हिंदु आणि शीख यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप

श्री अकाल तख्तचा निहंगांवर कारवाई करण्यास विरोध

शिखांचे धार्मिक पीठ असणार्‍या श्री अकाल तख्त साहिबचे जथ्थेदार (प्रमुख) ग्यानी हरप्रीत सिंह यांनी पंजाब सरकारला निहंगांवर गुन्हा नोंदवण्यास विरोध करणारे निवेदन जारी केले होते. ते म्हणाले की, ख्रिस्ती पाद्री भोंदूगिरी करून हिंदु आणि शीख यांची दिशाभूल करत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करून घेत आहेत. याविषयी निहंगांनी अनेकदा तक्रार केली; मात्र सरकारने त्यांचे ऐकले नाही. यानंतर हा वाद पेटला.