अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

श्री. सागर चोपदार

मुंबई, २८ ऑगस्ट (वार्ता.) – अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे. श्री. सागर चोपदार यांनी पनवेल येथील खांदा कॉलनी पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार केली, तर मोटार वाहन विभागाच्या पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘ईमेल’द्वारे तक्रार केली आहे.

१. श्री. सागर चोपदार यांनी कोल्हापूर येथे जाण्यासाठी कळंबोली (पनवेल) ते कोल्हापूर या मार्गाचे २९ ऑगस्टचे ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या वातानुकूलित (स्लीपर) गाडीचे ‘रेड बस’च्या अ‍ॅपवरून ऑनलाईन तिकिट काढले. या तिकिटासाठी श्री. सागर यांच्याकडून १ सहस्र ७८५ रुपये घेण्यात आले. याच मार्गाच्या याच प्रकारच्या गाडीचे राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीचे तिकीट मात्र ७८१ रुपये इतके आहे.

२. शासनाच्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीटदरापेक्षा खासगी टॅ्रव्हल्स अधिकतम दीडपट तिकीट आकारू शकतात. या नियमानुसार खासगी ट्रॅव्हल्सना मुंबई ते कोल्हापूर वातानुकूलित (स्लीपर) गाडीच्या तिकिटाचा अधिकतम १ सहस्र १७२ रुपयांपर्यंत आकारता येऊ शकतो; परंतु ‘वैभव टॅ्रव्हल्स्’कडून ६१३ रुपये अधिक आकारण्यात आले आहेत.

३. स्वत:ची आर्थिक फसवणूक झाली असल्याप्रकरणी श्री. सागर चोपदार यांनी ‘वैभव टॅ्रव्हल्स्’चे चालक, मालक, संचालक, तसेच संबंधित यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे.