कोरोना संसर्गाच्या काळात घ्यावयाची काळजी

सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. त्या दृष्टीने आपण काय काळजी घेऊ शकतो ? याविषयीची काही मार्गदर्शक सूत्रे येथे देत आहोत.

वैद्य परीक्षित शेवडे

१. सायनुसायटिस

यात डोके, कपाळ दुखणे, नाकाच्या हाडाजवळ वेदना होणे, वास न येणे, शिंका येणे, नाकातून पाणी वहाणे, तोंडाने श्वास घ्यावा लागणे आदी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे आढळल्यास पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

अ. वातानुकुलित हवेचा थेट स्पर्श टाळावा.

आ. रात्री झोपतांना कानात कापसाचे बोळे घालावेत. शक्य असल्यास कानटोपी किंवा स्कार्फ बांधून झोपणे उत्तम.

इ. आहारात दूध आणि दुधाचे पदार्थ विशेषतः दही अन् ताक टाळावे. आंबट आणि आंबवलेले पदार्थ टाळावेत.

ई. सकाळी उठल्यावर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रमाणात पाणी पिणे टाळावे; कारण या काळात प्यायलेल्या पाण्याचे योग्य रितीने पचन न झाल्यास त्याचे रूपातंर कफामध्ये होते.

उ. ओव्याची पुरचुंडी करून ती उष्ण करावी. त्या पुरचुंडीने कपाळ, नाकाच्या दोन्ही बाजूंच्या गालाचा भाग शेकावा. याने कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास साहाय्य होते.

ऊ. हळद, सुंठ आणि वेखंड यांचे समप्रमाणात उगाळलेली पेस्ट किंवा समप्रमाणात एकत्रित केलेले चूर्ण पाण्यात कालवून गॅसवर उष्ण करून त्याचा लेप कपाळावर लावावा. सुकल्यानंतर लेप काढावा. असे दिवसभरात २ – ३ वेळा करावे.

२. छातीत कफ साचणे

यात श्वास घेतांना घर-घर आवाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार कोरडा खोकला येणे आणि ‘ऑक्सिमीटर’ने ‘पल्स’ पाहिल्यास प्राणवायू संपृक्तता (oxygen saturation) न्यून असणे आदी लक्षणे आढळल्यास ‘छातीत कफ साचला आहे’, असे ओळखावे. या अवस्थेत दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत, तसेच फळे खाणे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.

अ. २ चमचे मोहरीचे किंवा तिळाचे तेल कोमट करून त्यात १-२ चिमूट सैंधव मीठ घालून छाती, पाठ आणि कुशी यांना लावावे. त्यानंतर तो भाग वाफार्‍याच्या साहाय्याने शेकावा. तेलात घातलेल्या मिठाने कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास साहाय्य होते. ताप नसेल, तर उष्ण पाण्याने अंघोळ करावी.

आ. १ चमचा भाजलेले जवस १ कप पाण्यात उकळून गाळून ते पाणी रात्री जेवणानंतर प्यावे. यात जवस पाण्यात उकळून आटवून त्याचा काढा करू नये, पाण्यात केवळ उकळणे अपेक्षित आहे.

इ. पुनर्नवा, हळद आणि सुंठ यांचे समप्रमाणात एकत्रित केलेले चूर्ण पाण्यात कालवून कोमट करून त्याचा लेप छातीला  लावावा.(खालील बाजूने जिथे फुफ्फुसे असतात.) लेप सुकल्यावर काढावा.

३. कोविड काळात किंवा कोविड होऊन गेल्यानंतरचा आहार कसा असावा ?

कोविडमुळे येणारा थकवा आणि फुफ्फुसांची हानी भरून काढणे, कफ न्यून करणारा अन् वात वाढू न देणारा, तसेच बळ वाढवणारा असा आहार घेणे आवश्यक असते.

अ. शेवगा : याच्या पाल्याची भाजी किंवा सूप किंवा शेंगाची भाजी खाऊ शकतो. याने वात वाढत नाही आणि कफही न्यून होतो.

आ. मुगाचे कढण करून पिऊ शकतो.

इ. थकवा न्यून होण्यासाठी प्रोटिन (प्रथिने) पावडर घेऊ नये. याने लाभ होण्याऐवजी पचनावर ताण येतो.

ई. कोणतेही सूप किंवा पदार्थ घेण्यापूर्वी त्यात १-२ चिमूट त्रिकटू चूर्ण वरून घालावे. त्यामुळे कफ वाढत नाही.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

(साभार : वैद्य परीक्षित शेवडे यांचा ‘यू ट्यूब’वरील  व्हिडिओ)

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी आपण आपल्या वैद्यांशी वा आधुनिक वैद्यांशी (डॉक्टरांशी) बोलून घेऊन औषधोपचार घ्यावेत. – संकलक