जळगाव, १६ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी (जळगाव) येथे भारतमातेच्या चित्राचे पूजन करणे, क्रांतीकारकांच्या कार्याचे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन लावणे, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणे आणि सामूहिक ध्वजवंदन आदी उपक्रम राबवण्यात आले. यावल तालुक्यातील अट्रावल आणि हिंगोणा येथील शाळांमध्ये श्री. धीरज भोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाविषयी संबोधित केले. जिजामाता कन्या शाळा, धुळे आणि पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी (धुळे) येथेही क्रांतीकारकांच्या कार्याचे फ्लेक्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
जिजामाता शाळेत श्री. जयेश बोरसे यांनी विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. पाळधी येथील प्रदर्शनास पोलीस निरीक्षक गणेश बुवा, सरपंच श्री. शरद कोळी, श्री. विक्रांत गुलाबराव पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, पत्रकार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे येथील धर्मप्रेमी कु. रूपाली राठोड आणि राकेश पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रदर्शन लावले. त्याला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिकार्यांना यावल गडाची माहिती असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट !स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे यावल येथील आदिवासी बांधवांच्या कार्यक्रमाला आले होते. समितीचे श्री. धीरज भोळे आणि ‘एक दिवस महाराजांसाठी’ या संघटनेचे डॉ. अभय रावते यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना ९ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील यावल गडाची माहिती असलेला अंक भेट दिला. श्री. राऊत हे जिल्ह्यातील गडांच्या संवर्धनाविषयी सकारात्मक आहेत. |