पाकमधील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे हिंदु मंदिर अतिक्रमणमुक्त !

वाल्मीकी मंदिर

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे प्राचीन हिंदु मंदिर अवैध नियंत्रणातून मुक्त करण्यात आले आहे. एका ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधातील न्यायालयीन लढा जिंकून मंदिर मुक्त करण्यात आले. यानिमित्त स्थानिक हिंदूंनी मंदिरात ३ ऑगस्ट या दिवशी धार्मिक सोहळा आयोजित केला होता.

शहरातील प्रसिद्ध अनारकली बाजारात असलेले वाल्मीकी मंदिर २० वर्षांपासून एका ख्रिस्ती कुटुंबाच्या कह्यात होते. मंदिरावर अधिकार सांगणार्‍या या ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु धर्माचा स्वीकार केल्याचा दावाही केला होता. आता हिंदूंना मंदिराचा अधिकार मिळाल्यानंतर लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील बाबरीच्या पाडावानंतर वर्ष १९९२ मध्ये सशस्त्र जमावाने वाल्मीकी मंदिरावरही आक्रमण केले होते. त्या वेळी मंदिरातील देवांच्या मूर्तींचीही हानी करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

भारतामध्ये कधी चर्च अथवा मशिदी यांच्यावर हिंदूंनी अवैध ताबा मिळवल्याचा स्वप्नात तरी कुणी विचार करील का ?