सर्व पायाभूत सुविधा असतांना काही विषयांत गोव्यातील विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी अल्प का ?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शाळाप्रमुखांना प्रश्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – ‘शाळा आणि शिक्षक यांना सर्व पायाभूत सुविधा देऊनही गणित आणि विज्ञान या विषयांमधील गुणांची सरासरी राष्ट्रीय सरासरीहून अल्प का ?’, असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना विचारला. ‘गोवा मुख्याध्यापक संघटने’कडून जुने गोवे येथे मुख्याध्यापकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘काही शिक्षकांना सामावून घेण्यासाठी काही शैक्षणिक संस्था कला किंवा विज्ञान शाखांसाठी त्यांचे वर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोव्यातील शैक्षणिक संस्थांनी शेजारील राज्यातील संस्थांचा आदर्श घ्यावा. ‘ड्रोन स्कूल’चा (ड्रोनचे तंत्रज्ञान शिकवणारी शाळा) प्रस्ताव एकाही संस्थेने पुढे नेला नाही. या संस्थांनी कौशल्यावर आधारित काही नवीन अभ्यासक्रम चालू केले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी त्या विषयात प्रावीण्य मिळवल्यानंतर त्याच्या रोजगाराच्या दृष्टीने लाभ कसा होईल ? याचा विचार केला पाहिजे. इयत्ता दहावीत १०० टक्के निकाल लागावा या दृष्टीने इयत्ता ९ वीचा निकाल कडक लावला जातो. इयत्ता ९ वी अनुतीर्ण झालेले काही विद्यार्थी नंतर शाळा सोडतात. त्या विद्यार्थ्यांची काळजी कोण घेणार ? त्यांना रोजगाराभिमुख उपक्रम देण्यासाठी कोण प्रयत्न करणार ? सरकार याविषयी गांभीर्याने विचार करत आहे. सरकार इतर शाळांना लाभ व्हावा; म्हणून शाळा बंद करायला निघालेले नाही. तसा सरकारचा हेतूही नाही. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची काळजी आम्हाला आहे. अल्प शिक्षक असलेल्या शाळांचीही आम्हाला चिंता आहे. शाळांनी सहकाराचे तत्त्व अंगीकारावे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी स्पर्धा करू नये.’’