रस्त्याअभावी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही !

पूर्णानगर (जिल्हा अमरावती) येथील नागरिकांचा निर्णय !

अमरावती – येथील भातकुली तालुक्यातील पूर्णानगर गावातील रस्ता अतीवृष्टीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाचा त्रास होत आहे. ‘रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला; मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत आहे’, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. काही दिवसांनी गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. रस्त्याअभावी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा सामूहिक निर्णय पूर्णानगर येथील गावकर्‍यांनी घेतला आहे. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले आहे. (गावात रस्ते सिद्ध करून देणे, हे प्रशासकीय अधिकार्‍यांचे कर्तव्य आहे. वारंवार तक्रार करूनही आणि निवेदने देऊनही रस्ता नीट न करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही गावातील रस्त्यांची दुर्दशा असणे प्रशासनाला लज्जास्पद !