चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्यासाठी ठरू शकतो संकट !

अमेरिकी संरक्षण विभागाच्या अहवालातून माहिती

जगात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची संचालन प्रणाली केवळ चीनकडे !

बीजिंग (चीन) – चीन हा छुप्या पद्धतीने लांब पल्ल्याची, तसेच अल्प अंतर कापू शकणारी पारंपरिक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणात बनवत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसारित केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली. या अहवालानुसार चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडे आता भूमी, तसेच समुद्राच्या आतून आक्रमण करू शकतील, अशी क्षेपणास्त्रे आहेत. चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका आणि भारत दोघांसाठी संकट ठरू शकतो, असेही यात म्हणण्यात आले आहे. ‘पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याची वाढती सिद्धता हे भारतासाठी संकट होऊ शकते’, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.
अहवालानुसार पारंपरिक आणि परमाणू क्षेपणास्त्रे यांच्या संचालन प्रणालीचा विचार केल्यास चीनची प्रणाली सर्वांत अत्याधुनिक आहे.

चीनजवळ सर्वांत शक्तीशाली ‘क्रूज’ क्षेपणास्त्रे !

हिंद आणि प्रशांत महासागरांच्या क्षेत्रामध्ये जवळपास २ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. या क्षेपणास्त्रांपैकी काहींची क्षमता ही १ सहस्र ८०० किलोमीटर आहे. आज चीनजवळ सर्वांत शक्तीशाली ‘क्रूज’ क्षेपणास्त्रे आहेत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !

यासमवेतच चीनजवळ सर्वांत सक्रीय आणि सर्वांत नवीन क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आहे. त्याच्याजवळ ७ सहस्र ते १५ सहस्र किलोमीटरपर्यंत वार करू शकतील, अशी अंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. या माध्यमातून चीनला अमेरिकेच्या मुख्य भूमीलाही लक्ष्य करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. चीनचे नौदल हे पाणबुड्यांवरून प्रक्षेपित करता येईल, अशी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यावरही काम करत आहे.

संपादकीय भूमिका

‘भारताने चीनच्या जागतिक स्तरावरील सैनिकी सिद्धतेचा सामना करता येईल’, अशी स्वत:ची क्षमता वाढवणे आवश्यक !