मुलीचे कान टोचणे हे बाल शोषण म्हणता येणार नाही ! – देहली उच्च न्यायालय

लहान मुलीचे कान टोचत असल्याच्या व्हिडिओ पाहून ‘मिंट’कडून बाल शोषण होत असल्याची टीका

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – मुलीचे कान टोचणे याला ‘बाल शोषण’ म्हणता येणार नाही. बाल शोषणाचे आरोप हे गंभीर आरोप आहेत. ते योग्य प्रकारे पडताळणी केल्याखेरीज केले जाऊ शकत नाहीत. ते लेखकाच्या व्यक्तीगत मतांवर आधारित असू शकत नाही, असे देहली उच्च न्यायालयाने अलीकडेच एक अंतरिम आदेश पारित करतांना म्हटले आहे. ‘यू ट्युब’ वाहिनी चालवणारे गौरव तनेजा यांनी त्यांच्या त्यांच्या मोठ्या मुलीचे कान टोचत असतांनाची चित्रफीत (व्हिडिओ) त्यांच्या सामाजिक संकेतस्थळावर पोस्ट केली होती. त्यावरून ‘मिंट’ने या वृत्तसंकेतस्थळाने गौरव तनेजा आणि त्यांची पत्नी रितू राठी यांच्यावर बाल शोषणाचा आरोप करणारा लेख ८ मे २०२२ या दिवशी प्रकाशित केला होता. या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. या आदेशाद्वारे न्यायालयाने लेख काढून टाकण्याचे आदेश देण्यासमवेतच ‘मिंट’, त्याची पत्रकार शेफाली भट्ट आणि संपादक-प्रमुख श्रुतिजीथ के.के. यांना कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून लेख प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे प्रतिबंधित केले आहे. न्यायालयाने पत्रकार अभिषेक बक्षी यांना या लेखासंदर्भातील त्यांचे ट्वीट काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

१. न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर टीका करण्याचा अधिकार इतरांना निःसंशयपणे आहे आणि अशी टीका अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात समाविष्ट केली जाईल. तथापि माध्यमस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर आक्रमण केले जाऊ शकत नाही. उपरोक्त चलचित्रांमध्ये बाल शोषणाच्या आरोपांना पुष्टी देणारे काहीही नाही.

२. गौरव तनेजा यांनी केलेल्या अन्य एका ट्वीटमध्ये हवनचे छायाचित्र होते. त्यात तनेजा, राठी आणि त्यांची धाकटी मुलगी पूजा करत होते. या ट्वीटमध्ये लिहिले होते की, हिंदु धर्म हा एक विज्ञानावर आधारित जीवनपद्धती आहे. नियमितपणे हवन करत असलेली दोन कुटुंबे ३ डिसेंबर १९८४ या दिवशी भोपाळ येथे झालेल्या गॅस गळतीमध्ये बाधित झाले नाहीत. त्यांनी नियमित अग्निहोत्र (हवन) केले, जे प्रदूषणावर नैसर्गिक उतारा आहे.
या व्हिडिओवरही ‘मिंट’ने त्यांच्या लेखात आक्षेप घेतला होता.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मातील प्रथांवर ऊठसूठ टीका करणार्‍यांचे कान न्यायालयानेच टोचले !
  • असा आक्षेप कधी अन्य धर्मियांच्या प्रथांवर घेतला जातो का ?