पुणे – महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे; पण ‘यावर कारवाई कशी करावी ?’, याची स्पष्टता येण्यासाठी महापालिकेने प्रदूषण महामंडळाला पत्र लिहून मार्गदर्शन मागितले आहे. पीओपीची मूर्ती विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना विनामूल्य दिले जात होते; मात्र ‘या वर्षी ते खरेदी करणार नाही’, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पीओपीच्या मूर्ती बनवणार्या मूर्तिकारांवर कशाप्रकारे कारवाई करावी ?, कह्यात घेतलेल्या मूर्तींचे काय करावे ?, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करायची कि अन्य पद्धतीने कारवाई करायची ?, याची स्पष्टता नसल्याने प्रदूषण महामंडळाला पत्र पाठवून मार्गदर्शन करण्यासंदर्भात सांगितले आहे, अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. पीओपी मूर्तिकारांवर घनकचरा विभाग कि अतिक्रमण विभाग कारवाई करणार, हे अद्याप ठरले नाही.