राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस चालू झाल्यावरच रस्त्यांवर खड्डे दिसू लागले. यातून काही मासांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा नेमका कसा होता ? हे आता सर्वांच्या समोर आले आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी काही मास रस्त्याचे काम करून पुढील ६-७ मास अक्षरश: खड्ड्यातील रस्ते शोधत नागरिकांना प्रवास करावा लागतो, हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशाच स्थितीत नागरिकांनाही प्रवास करण्याविना पर्याय नाही. रस्त्यांवरील खड्डे पाहिल्यास ‘आपण विकासाकडे वाटचाल करणार्या स्वतंत्र भारतात आहोत का ?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.
सध्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळच्या रस्त्याची स्थिती तर न पहाण्यासारखी झाली आहे. येथील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. केवळ काही घंटे झालेल्या पावसाने रस्ते प्रवास न करण्याच्या लायकीचे झाले आहेत. यातून याचे काम ठेकेदाराने कसे केले असेल ? याची आपण कल्पनाच करू शकतो. रस्ते आणि खड्डे हे समीकरणच झाले आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने कोकणात येणार्या गावाकडील लोकांना श्री गणेशाची मूर्ती आणतांना आणि विसर्जनाच्या वेळेसही हे खड्डे चुकवतच पायपीट करावी लागते.
अन्य देशांमध्ये होणारा ‘रस्ता हा देशाच्या विकासाचा राजमार्ग आहे’, हा विचार भारतात होतांना दिसत नाही. आपण बांधत असलेल्या रस्त्यांवरून आपल्यासहित अन्य लोकांनाही जायचे आहे, याचा विसर पडलेला आहे. ‘आपण ज्या समाजात रहातो, ज्या समाजाचे आपल्यावर ऋण आहेत, तो समाज ये-जा करणार आहे’, याचे भान समाजाला धर्मशिक्षण नसल्याने नाही. ज्या प्रकारे खासगी क्षेत्रात कोणतेही काम केल्यास त्याचे मूल्यमापन केले जाते आणि प्रसंगी शिक्षाही केली जाते, त्याचप्रकारे ठेकेदाराने केलेल्या कामाचे मूल्यमापन, मग तो मुख्य रस्ता असो वा दुरुस्ती त्याचे मूल्यमापन झालेच पाहिजे. त्याचे उत्तरदायित्व ठरवून रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याचे दायित्वही त्या ठेकेदारावरच अथवा संबंधित शासकीय यंत्रणेवर असलेच पाहिजे. रस्त्यांची दुर्दशा करणार्या ठेकेदारांची नावे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे घोषित करून त्यांना योग्य ती शिक्षाही झाली पाहिजे. असे झाले, तरच थोड्या फार प्रमाणात तरी रस्ते चांगले होतील आणि त्यावरून प्रवास करणार्या सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही !
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी