कोल्हापूर, १९ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रातील अनेक गडदुर्ग आणि तेथील समाध्या, मंदिरे यांची पडझड होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि पन्हाळा येथील गडांची तीच अवस्था आहे. तरी पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व विभाग, तहसीलदार, तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. नितीन चव्हाण, नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, श्री. अभिनंदन सोळांकुरे, श्री. रोहित पाटील, मोडी लिपी परिवार, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरवीर श्री शिवा काशीद यांच्या समाधी स्थळापासून भगव्या ध्वजाचे पूजन करून गडावरून शेकडो धारकर्यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली. केलेल्या मागण्यांवर विचार करून त्वरित पाठपुरावा न केल्यास हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल, अशी चेतावणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
निवेदनातील काही मागण्या
१. पन्हाळा गडावर मद्यविक्रीचे दुकान असणे अत्यंत निंदनीय आहे. अशा पदार्थांच्या विक्रीमुळे गडाच्या पवित्रतेला धक्का पोचतो. त्यामुळे मद्यविक्री, निवासव्यवस्था अशा गोष्टींवर पूर्णत: बंदी घालावी. गडांवरील अवैध बांधकामे काढावीत.
२. गडांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांना चाकरीत सहभागी करून घ्यावे जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल आणि गडांची देखभाल, दुरुस्ती चांगल्या प्रकारे होईल.