श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेनंतर नित्योपचार पूर्ववत् चालू !

श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेनंतर नित्योपचार पूर्ववत् चालू

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी यात्रेनंतर १८ जुलै या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली. यात्रेच्या कालावधीत अधिकाधिक वारकर्‍यांना श्री विठ्ठलाचे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर २४ घंटे उघडे असते. त्यामुळे त्यानंतर प्रक्षाळपूजेच्या निमित्ताने ‘भक्तांसाठी अहोरात्र उभे राहून थकलेल्या विठुरायाचा क्षीण दूर व्हावा’, यासाठी देवाला तेल लावण्यात आले. आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेल्या काढ्याचा नैवैद्य दाखवण्यात आला. (गवती चहा, तुळस, ज्येष्ठमध, लवंग, वेलदोडे, गूळ, जायफळ, काळी मिरी अशा विविध आयुर्वेदिक वनस्पतींपासून सिद्ध केलेला काढा देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो.)

या दिवशी विविध रंगांच्या फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली होती. यात्रेच्या काळात बंद करण्यात आलेले नित्योपचार प्रक्षाळपूजेनंतर (१८ जुलैपासून) पुन्हा चालू करण्यात आले आहेत.