‘काली’ माहितीपटाचे आक्षेपार्ह भित्तीपत्रक आगा खान संग्रहालयाने क्षमा मागत हटवले !

जागतिक स्तरावर हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !

टोरंटो (कॅनडा) – येथे ‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकावर श्री महाकाली मातेच्या वेशभूषेत असणारी अभिनेत्री सिगारेट ओढतांना दाखवण्यात आल्याने त्याला हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. येथील भारतीय उच्चायुक्तालयानेही हे भित्तीपत्रक ठेवलेल्या आगा खान संग्रहालयाला ते हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे भित्तीपत्रक हटवण्यात आले असून या संग्रहालयाने भित्तीपत्रक ठेवल्यावरून क्षमाही मागितली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला याविषयी खेद आहे की, आम्ही आमच्या ‘अंडर द टेंट’ या प्रकल्पाच्या अंतर्गत ठेवलेल्या १८ माहितीपटांमध्ये ‘काली’ माहितीपटाचा ही समावेश होता. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना आमच्याकडून अजाणतेपणे दुखावण्यात आल्या.’

या माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी अद्याप क्षमा मागितलेली नाही किंवा हे भित्तीपत्रक मागे घेतलेले नाही. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘मी न घाबरता माझा आवाज उठवत रहाणार आहे.’ दुसरीकडे ट्विटरने मणीमेकलई यांनी कालीचे भित्तीपत्रक पोस्ट केलेले ट्वीट हटवले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने विरोध करतात, तर अन्य धर्मीय हातात शस्त्रे घेतात. यातून असहिष्णु कोण आहे, हे वेगळे सांगायला नको !