१. मंदिरांमध्ये वस्त्रसंहितेची आवश्यकता !
आपली मंदिरे ही सात्त्विकता प्रदान करणारी केंद्रे आहेत. भाविक मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेतो, तेव्हा त्याला सात्त्विकतेचा लाभ होतो. मंदिरांतील देवतांच्या मूर्तींमधून मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती, अर्थात् आधुनिक भाषेत सकारात्मक स्पंदने (पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स) प्रक्षेपित होत असतात. आपल्याला मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असली पाहिजे. आपल्या मनात देवतेप्रती भाव असला पाहिजे. जसे ‘रेडिओ’ ऐकायचा असेल, तर योग्य ‘फ्रिक्वेन्सी’ शोधावी लागते, तसे देवतेच्या तत्त्वाशी आपली ‘फ्रिक्वेन्सी’ जुळण्यासाठी सत्त्वगुण हा पुष्कळ महत्त्वाचा आहे. वृत्ती सात्त्विक होण्यासाठी भाविकाला साधना करावी लागते. साधनेच्या तुलनेत त्याला सात्त्विक वेशभूषा करणे सहज शक्य असते. त्यामुळे त्याला देवतेच्या सात्त्विकतेचा अधिकाधिक लाभ घेता येतो.
२. मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता कशी असावी ?
हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. अनेकांच्या मनात हाही प्रश्न असतो की, आपल्या कुठल्याही धर्मग्रंथांत वस्त्रसंहितेचे विवरण नाही. यासाठी मी स्पष्ट करू इच्छितो की, प्राचीन काळापासूनच भारतात साात्त्विक वेशभूषा परिधान केली जात होती. त्यामुळे आपल्या धर्मशास्त्रकारांना वेगळ्या वस्त्रसंहितेची आवश्यकताच वाटली नाही. वर्ष १९५० नंतर भारतियांचे जसजसे पाश्चात्त्यीकरण होऊ लागले, तसतशी आपली वेशभूषा पालटत गेली. त्यामुळे आज सात्त्विक वस्त्रसंहितेची आवश्यकता निर्माण झाली आहे. तामिळनाडू उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार भाविकांनी केवळ भारतीय पारंपरिक वस्त्रे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिलांसाठी साडी, ओढणीसह परकर पोलके, सलवार-कुर्ता यांसारख्या सात्त्विक वेशभूषेला मान्यता देण्यात आली आहे, तर पुरुषांसाठी सदरा, धोतर, लुंगी किंवा पायजमा किंवा सामान्य शर्ट-पँट यांना मान्यता देण्यात आली आहे. चामड्याचे पट्टे आणि ‘पर्स’ यांसह ‘स्कर्ट’, ‘मिडी’, ‘शॉर्ट पँट’, ‘सँडो बनियन’, ‘जीन्स’ इत्यादी पाश्चात्त्य वस्त्रे वर्जित करण्यात आली आहेत.
आज १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपति बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू झाली आहे. जगभरातील लोक गोव्यात फिरायला येतात, तोकड्या वस्त्रांमध्ये समुद्र किनाऱ्यांवर फिरतात आणि पर्यटन म्हणून मंदिरेही पहातात; मात्र मला आनंद वाटतो की, गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता यापूर्वीच लागू केली आहे. ही वस्त्रसंहिता विदेशी पर्यटकांनाही लागू आहे. मंदिरे ही पर्यटनस्थळे नाहीत. भाविक धार्मिक ठिकाणी येतात. त्यामुळे त्यांनी धार्मिकता पाळायला हवी.
३. सर्व क्षेत्रांत वेशभूषेच्या नियमांचे पालन केले जाते; मग मंदिरात का नाही ?
मंदिरांमध्ये मंगलकारक किंवा पूर्ण कपडे परिधान करून जाणे, हा सुसंस्कृतपणा आहे. या सुसंस्कृतपणाला आधुनिक लोक ‘शिष्टाचार’ म्हणतात. व्यवहारात जगतांना आपण त्या सर्व शिष्टाचारांचे पालन करतो, उदा. लग्न समारंभामध्ये भरजरी कपडे परिधान केले जातात, तेथे आपण ‘शॉर्टस्’ किंवा ‘सँडो टी-शर्ट’ सारखे कपडे परिधान करत नाही. एखाद्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कुणी भरजरी कपडे घालून जात नाहीत. तेथे आपण साधे किंवा शक्यतो धूतवस्त्र परिधान करतो. वेशभूषेच्या संदर्भात समाजात प्रचलित असलेले हे अलिखित संकेत कुणी मोडले, तर त्या व्यक्तीला नावे ठेवली जातात. काही आस्थापनांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट वेशभूषा करण्याचे बंधन असते, त्या ठिकाणी कुणीही विरोध करत नाही. पोलीस प्रशासनाला खाकी गणवेश असतो, तर अनेक महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट गणवेश असतो. अगदी डॉक्टरांना ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये जायचे असेल, तर तेथील नियमांनुसारच सर्व आवश्यक काळजी घेऊन ठराविक वस्त्रेच परिधान करावी लागतात. अगदीच काय, तर आता स्वतःला पुढारलेले म्हणवणारे मेजवान्यांचे (‘पार्ट्यां’चे) आयोजन करतात, त्यांतही ठराविक ‘ड्रेसकोड’ असतो. त्यानुसार वेशभूषा करणाऱ्यांनाच ‘पार्टी’त प्रवेश दिला जातो. समाजातील सर्व क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू केली जात असतांना मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात काहीही अयोग्य नाही !
‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यासाठी काही प्रयत्नअ. आपल्या परिसरातील ‘तात्काळ वस्त्रसंहिता लागू होऊ शकते’, अशा मंदिरांची प्रथम सूची बनवावी. माझे सर्वांना आवाहन आहे की, आपण मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्याच्या देशव्यापी आंदोलनाला उत्साहात आरंभ करूया. मंदिरे टिकली, तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला, तर आपण टिकू. – सद्गुरु नंदकुमार जाधव |
सध्या हिंदु धर्म न मानणारे किंवा देवतेवर श्रद्धा नसलेले आधुनिकतावादीच मंदिरांतील वस्त्रसंहितेला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करत असतात. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, याला आम्ही ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणणार नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.
४. देशभरातील प्रत्येक मंदिरात ‘वस्त्रसंहिता’ लागू होईपर्यंत अभियान राबवा !
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू करतांना ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्ष शासनाने योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात; मात्र मंदिरांत संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे साधे आवाहनही चालत नाही. हा विरोधकांचा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. देशातील अनेक चर्चमध्येही ड्रेसकोड आहेतच, मुसलमानांमध्ये तर ‘बुरखा’ हा महिलांसाठी सर्वत्र आणि कायमस्वरूपीचा ‘ड्रेसकोड’ आहेच. त्यांना कुणी विरोध करत नाही; मात्र मंदिरांतील ‘ड्रेसकोड’ला विरोध केला जातो. कोणत्याही सत्कार्याला विरोध हा होतच असतो. त्यामुळे या उपक्रमालाही विरोध होणारच आहे. तथापि हा विरोध वैध मार्गाने मोडून काढत आज आपण देशभरातील सर्व मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू होण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करूया.
– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.