ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हे दोन ग्रंथ, म्हणजे साधक अन् जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठीचे अमूल्य मार्गदर्शक !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (सनातनचे १०१ वे संत भाऊकाका (वय ८६ वर्षे)) यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर लिहिलेला ‘गीताज्ञानदर्शन’ आणि अध्यात्मशास्त्रावर लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे दोन्ही ग्रंथ मी अभ्यासले. ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथातील उपसंहारात अध्यात्मशास्त्रातील अनेक संज्ञा आणि सूत्रे यांसमवेत बरीच अवांतर माहिती दिली आहे, तर त्यांनी नंतर लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथात प्रामुख्याने ‘ज्ञानयोगा’वर विस्तृत लिखाण केले आहे. हे दोन्ही ग्रंथ गीतेत उद्धृत केलेल्या चारही (भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग) मार्गांपैकी कुठल्याही मार्गाने साधना करणारे साधक, जिज्ञासू आणि गीतेवर सखोल अभ्यास करणारे यांना बहुमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत. त्याचा परामर्श पुढील लेखात आला आहे.

पू. अनंत आठवले

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) हे स्थापत्य अभियंता (बी.ई. सिव्हिल) असून त्यांनी ३१ वर्षे शासकीय संस्थेत नोकरी केली आहे. लहानपणीच ‘दासबोध’ आणि ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथांशी परिचित असलेल्या पू. भाऊकाका यांनी ‘ब्रह्मज्ञान मिळवणे’, या ध्येयाने प्रेरित होऊन तत्त्वज्ञानावरील विविध ग्रंथ अभ्यासले. त्यांत ‘विवेकचूडामणी, श्रीमद्भगवद्गीता, उपनिषदे, नारदभक्तिसूत्र, पातंजलयोगदर्शन, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध’ आदी ग्रंथांचा समावेश आहे. त्यांच्या या चतुरस्र अभ्यासाची झलक त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत दिसून येते. पू. भाऊकाका यांनी ग्रंथात वापरलेल्या ओघवत्या भाषेमुळे ग्रंथांतील तत्त्वज्ञान सामान्यांना समजणे सुलभ झाले आहे, तसेच या ग्रंथांत ‘पू. भाऊकाका यांची श्रीमद्भगवद्गीतेवर असलेली दृढ श्रद्धा, अभ्यासू वृत्ती, विश्लेषण करण्याची हातोटी, स्वतःला आलेली प्रचीती आणि ‘समष्टीला ज्ञान मिळावे’, अशी उत्कट इच्छा’ आदी गुणांची प्रचीती येते. सध्या वेळेच्या अनुपलब्धतेमुळे तत्त्वज्ञानावरील उपलब्ध ग्रंथ वाचून त्यावर चिंतन करणे साधकांना शक्य होत नाही. त्यामुळे ‘साधक आणि जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय शक्य तेवढ्या लवकर गाठणे सुलभ जावे’, या तळमळीने पू. भाऊकाका यांनी वरील ग्रंथांचे लिखाण केले आहे.

श्री. शिरीष देशमुख

१. गीतेचा अन्वयार्थ अनेकांनी प्रकृतीनुरूप लावलेला असणे

पू. भाऊकाका यांनी गीतेची व्याख्या ‘साधनापथावरून चालणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणारी भगवान श्रीकृष्णांची शिकवण’, अशी सोपी करून सांगितली आहे. गीतेवर शेकडो भाष्ये लिहिली गेली आहेत. त्यांत संस्कृतमध्ये लिहिलेल्या सुमारे ५० ग्रंथांचाही समावेश आहे. या सर्व ग्रंथांचे मूळ ‘गीता’ हे असले, तरी लेखक आणि वाचक यांची मते वेगवेगळी आहेत. विविध लेखकांनी गीतेवर भाष्य करतांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे गीतेचा अन्वयार्थ लावला आहे, उदा. लोकमान्य टिळक यांचा कर्मयोग, तर वेदांत समितीचा भक्तीमार्ग इत्यादी. यामागील कारण म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, या साधनेच्या मूलभूत सिद्धांतानुसार लेखक आणि वाचक यांच्या गीता समजण्यात तफावत असते. अवघ्या ७०० श्लोकांची गीता (त्यांतीलही ५७४ श्लोक श्रीकृष्णाचे आहेत.) अभ्यासतांना बुद्धीचा अक्षरशः कीस पडतो.

२. संत कबीर यांचे दोहे ऐकल्यावर मनातील अध्यात्माविषयीची जिज्ञासा जागृत होणे

कळण्याचे वय झाल्यानंतर मी संत कबीर यांचे दोहे आणि पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली संत कबीर यांची भजने ऐकली आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हिंदु धर्मावरील लिखाण माझ्या वाचनात आले. मी स्वतःही विद्युत् अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असल्याने माझा विवेक बऱ्यापैकी चांगला होता. संत कबीर यांचे योग, योगी, इडा-पिंगळा-सुषुम्ना नाड्या, वैराग्य आदी शब्द कानावर पडल्याने माझ्या मनातील अध्यात्माविषयीची जिज्ञासा जागृत झाली. माझ्या आयुष्यातील बरीच वर्षे नोकरी आणि व्यवसाय यांत गेल्याने साधनेला प्रारंभ करण्यात बराच काळ गेला.

३. रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि पू. भाऊकाका यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वाचन यांमुळे ज्ञानयोगाच्या अभ्यासास आरंभ होणे

वर्ष २०१३ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आलो. तेव्हा मी गीतेच्या खंडित झालेल्या अभ्यासास परत प्रारंभ केला. आश्रमातील जीवनाची सवय झाल्याने आणि सत्मध्ये राहिल्याने ज्ञानयोगाला परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले, तरीही गीता अन् त्यावरील भाष्ये वाचून मनात अनेक शंका उद्भवल्या. पू. भाऊकाकांचा ‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ वाचल्यावर माझ्या मनातील या शंकांचे काही प्रमाणात निरसन झाले. नंतर ६ – ७ वर्षांनी  पू. भाऊकाकांचा ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हा ग्रंथ माझ्या वाचनात आला. तेव्हा मला ‘ज्ञानयोगाच्या दृष्टीने गीतेत नेमके काय वाचले पाहिजे ?’, याचा बोध झाला.

४. ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथाची वैशिष्ट्ये

४ अ. ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथाची मांडणी : ‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ दोन विभागांत लिहिण्यात आला आहे. पहिल्या भागात गीतेतील अध्याय १ ते १८ यांमधील रचना पुढीलप्रमाणे दिल्या आहेत.

१. पू. भाऊकाका यांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायातील काही महत्त्वाच्या श्लोकांचे सर्वसाधारण साधकाला समजेल, अशा सुलभ मराठी भाषेत भाषांतर केले आहे.

२. यांतील काही श्लोकांचा पू. भाऊकाका यांनी काढलेला अन्वयार्थ दिला आहे.

३. संपूर्ण अध्यायावरील पू. भाऊकाका यांचे विवेचन दिले आहे. हे विवेचन इतक्या अल्प शब्दांत उद्धृत केले आहे की, त्यामुळे त्या अध्यायाचे श्लोक नमूद करण्याची आवश्यकताच भासली नाही.

४. ‘साधना’ या शीर्षकाखाली त्या अध्यायात श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशाचे सार देण्यात आले आहे. त्यामुळे साधकाला साधनेचे मर्म कळते.

५. ‘फळ’ या शीर्षकाखाली ‘वरील उपदेशाप्रमाणे साधना केल्यास कोणते फळ मिळेल ?’, हे सांगितले आहे.

६. शेवटी ‘त्या विशिष्ट अध्यायाला दिलेले नाव कसे समर्पक आहे ?’, हे सांगितले आहे.

४ आ. उपसंहार : यामुळे ज्ञानमार्गातील साधकाला ‘नीर-क्षीर’ विवेकाचा वापर करून चित्तशुद्धी, समत्व, वैराग्य आदींचे आवश्यक ज्ञान प्राप्त होते. (‘नीर-क्षीर विवेक’ म्हणजे ज्याप्रमाणे राजहंस पक्षी दुधातील दूध आणि पाणी वेगवेगळे करू शकतो, तसा योग्य आणि अयोग्य ओळखू शकणारा विवेक) अशा प्रकारे त्याला गुरुकृपायोगाचा महत्त्वाचा टप्पा गाठता येतो. उपसंहारामुळे कोणत्याही योगमार्गाने साधना करणाऱ्या साधकाला ब्रह्म जाणून घेण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी त्या योगमार्गाची मर्मस्थळे कळतात आणि तो योग्य दिशेने प्रगती करू शकतो.

४ इ. अध्यात्मशास्त्र आणि ज्ञानयोग यांवरील उद्बोधक विचार : ‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ सुमारे २०० पानांचा आहे. त्यांतील १०७ पानांवर ‘४ अ. आणि ४ आ.’ या सूत्रांप्रमाणे लिखाण आहे. उर्वरित सुमारे १०० पानांत ८ परिशिष्टे दिलेली आहेत. या परिशिष्टांत विविध विषयावरील उद्बोधक विचार, गीता आणि इतर धर्मग्रंथ यांत वापरल्या गेलेल्या संज्ञा अन् सूत्रे यांची सुबोध भाषेत सर्वसामान्य साधकाला कळेल, अशी माहिती दिली आहे. ती प्रत्येक साधक आणि जिज्ञासू यांनी नुसती वाचण्यासारखी नव्हे, तर आत्मसात् करण्यासारखी आहे. त्यामुळे ज्ञानमार्गी साधकांच्या अनेक शंकांचे निरसन होईल.

पू. भाऊकाका यांचे ‘अध्यात्मशास्त्र आणि त्यातही ज्ञानयोगावरील उद्बोधक विचार’ या ग्रंथात दिले आहेत. या व्यतिरिक्त ‘गीतेतील उपदेशावर आधारित साधनेचे सार, श्रीकृष्णाची अमूल्य वचने आणि रत्ने, वाचकांचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे’ आदीही या ग्रंथात उद्धृत केली आहेत. शेवटी ‘या ग्रंथाविषयी सनातनचे संत आणि साधक यांचे उद्गार अन् साधकांना या ग्रंथाविषयी आलेल्या अनुभूती’ दिल्या आहेत.

५. ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथाची वैशिष्ट्ये

५ अ. ‘साधनेची पूर्ण माहिती नसलेल्या साधकाला ती माहिती सहजतेने मिळावी आणि त्याप्रमाणे प्रयत्न करून त्याला ध्येय गाठणे सोपे जावे’, हा या ग्रंथाचा मूळ उद्देश असणे : अध्यात्मशास्त्राविषयी उपयुक्त लेखमाला असलेला आणि सुलभ मराठी भाषेत लिहिलेला मी वाचलेला हा पहिलाच ग्रंथ असावा. या ग्रंथाचा मूळ उद्देश पू. भाऊकाकांनी प्रस्तावनेतच उद्धृत केला आहे. साधनेची पूर्ण माहिती नसतांना केलेले प्रयत्न दिशाहीन असल्याने भरकटण्याची शक्यता असते. त्यामुळेच ध्येय गाठायला पुष्कळ वेळ लागू शकतो. असे अनेक विषय समजायला पुष्कळ अभ्यास, चिंतन आणि मनन करावे लागते. ‘इतरांचा वेळ वाचावा, त्यांना तितके श्रम करावे न लागता ही सर्व माहिती आयती मिळावी आणि तेथून पुढे प्रयत्न करून त्यांना ध्येय गाठणे सोपे जावे’, या विचाराने हे लेख लिहिले आहेत. यावरून ‘पू. भाऊकाका यांनी त्यांच्या व्यष्टी साधनेच्या समवेतच समष्टीचे हित साधून स्वतःची समष्टी साधना करून घेतली’, हे सिद्ध होते.

५ आ. कुठल्याही मार्गाने साधना करणाऱ्या साधकाला ज्ञानवर्धक ठरेल, असा ग्रंथ ! : ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथात २ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात पू. भाऊकाकांचे उद्बोधक लेख आहेत. या पहिल्या प्रकरणात ‘साधनेचे तीन प्रकार’ आदी २२ लेख आहेत. प्रत्येक लेख केवळ ज्ञानमार्गाने साधना करणाऱ्या साधकालाच नव्हे, तर कुठल्याही मार्गातील साधकाला ज्ञानवर्धक ठरेल, असाच आहे.

दुसऱ्या प्रकरणात जिज्ञासूंनी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत. या प्रकरणाचा प्रारंभ ‘संचित, प्रारब्ध, क्रियमाण आणि प्रारब्धावर उपाय’, या विषयांनी होऊन शेवट ‘भगवान श्रीकृष्ण, म्हणजे आनंद, चैतन्य, ज्ञान अन् शांती यांची परिसीमा’, या विषयाने झाला आहे. या ग्रंथात पू. भाऊकाकांनी आधी लिहिलेल्या ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथातील काही भाग पुन्हा घेतला आहे. हे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे या ग्रंथाला परिपूर्णता आली आहे.

६. साधकाला व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही स्तरांवर लाभदायक ठरलेले पू. भाऊकाकांनी लिहिलेले ग्रंथ !

सनातनचे आणि इतर संप्रदायांचे साधक जेव्हा धर्मप्रसारासाठी बाहेर पडतात, तेव्हा अतीचिकित्सक व्यक्ती अन् धर्माचे विरोधक त्यांना अनेक प्रश्न विचारतात. काही साधक अनेक वेळा या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात न्यून पडतात. वरील दोन्ही ग्रंथांतील लिखाणाचे सखोल चिंतन केले, तर त्यांची ही अडचण दूर होऊ शकते, तसेच त्यांची साधनेत भरकटण्याची शक्यता दूर होते. अशा प्रकारे साधकाला व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही स्तरांवर लाभ होतो.

या दोन्ही ग्रंथांप्रती आणि पू. भाऊकाकांबद्दल वरील लेख लिहून घेण्याची प्रेरणा देणाऱ्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२२)