साधक स्वभावदोषांची सारणी लिहितात. ते स्वभावदोष जावेत; म्हणून स्वयंसूचना देतात. साधकांनी इतकेच केले असते, तर ते योग्य झाले असते; बरेच साधक ते स्वभावदोष दिवसभर आठवतात आणि दुःखी होतात. काही साधक इतरांच्या गुणांशी किंवा प्रगतीशी तुलना करून ‘आपण त्यांच्या मागे आहोत’, हे आठवून दुःख करत रहातात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ‘प्रतिमास १० सहस्र, ५० सहस्र किंवा १ लाख रुपये मिळवणारे आपल्यापेक्षा जास्त मिळवणाऱ्यांशी तुलना करायला लागले, तर ते नेहमीच दुःखी होतील. त्याऐवजी १० सहस्र रुपये मिळवणाऱ्याने ‘मी नोकरी नसलेल्यापेक्षा अधिक सुखी आहे’, ५० सहस्र रुपये मिळवणाऱ्याने ‘मी १० सहस्र रुपये मिळवणाऱ्यापेक्षा अधिक सुखी आहे’, १ लाख रुपये मिळवणाऱ्याने ‘मी ५० सहस्र रुपये मिळवणाऱ्यापेक्षा अधिक सुखी आहे’, अशा प्रकारे विचार केला, तर ते दुःखी न होता आनंदी होतील.
साधकांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना मनुष्यजन्म दिला आहे, त्यांच्यात साधनेची आवड निर्माण केली आहे, त्यांना साधनेत मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यांची साधनेत प्रगतीही होत आहे. हे आठवल्यास ‘पृथ्वीवरील बहुसंख्य मानवांच्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या मनात देवाविषयी सतत कृतज्ञताभाव निर्माण होईल. स्वयंसूचना सत्रांच्या वेळी दोष आठवणे आणि ते घालवण्यासाठी स्वयंसूचना देणे, हे योग्य आहे. एरव्ही दिवसभर भावपूर्ण नामजप करावा किंवा कृतज्ञताभावात रहावे. ‘भाव तेथे देव’ असल्यामुळे त्या वेळी मनाला आनंदही मिळतो.
माझ्या उदाहरणावरून कृतज्ञताभावात राहिल्याने ‘सेवा कशी करता येते आणि मनाला कसा आनंद मिळतो’, हे लक्षात येईल. पूर्वी मी सर्वत्र सत्संग, अभ्यासवर्ग, जाहीर सभा इत्यादी घेण्यासाठी जात असे. आता कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी आतापर्यंत देवाने करून घेतलेली विविध कार्ये आठवली, तरी मला कृतज्ञताभावात आनंदात रहाता येते. खोलीत बसून ग्रंथलिखाणाची सेवाही रात्रंदिवस आनंदाने करता येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधकांनो, साधनेत प्रगती होण्यासाठी कृतज्ञताभावात रहा !
साधकांना साधनेत प्रगती करता येत नसली, स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करता येत नसली, तर त्यांना ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करा. भाव जागृत झाला की, साधनेतील बरेच अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल’, असे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांना ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथात दिल्याप्रमाणे प्रयत्न करण्यास सांगितले जाते. तेही बऱ्याच जणांना जमत नाही. अशांनी पुढील प्रयत्न केल्यास त्यांना भाव जागृत होण्यास साहाय्य होईल.
‘आपण एकटे राहू आणि जगू शकत नाही’, हे लक्षात घेऊन कुटुंबीय आपली घेत असलेली काळजी आणि आपल्याला देत असलेले प्रेम, इतर आपल्याला करत असलेले साहाय्य, तसेच भगवंताने आपल्याला दिलेले जीवन इत्यादी संदर्भातील दैनंदिन जीवनातील उदाहरणे पावला-पावलाला आठवल्यास कृतज्ञताभाव निर्माण होण्यास ५ – ६ आठवड्यांतच आरंभ होतो. पुढे तो वाढत जातो. त्यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले