परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७३ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
२९.६.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. उमेश शेणै साधनेसाठी देवद आश्रमात आल्यावर त्यांना साधनेच्या दृष्टीने झालेला लाभ पाहिला. या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, अन्य संतांच्या भेटी आणि ईश्वरी राज्याचे प्रतीक असलेला रामनाथी आश्रम या संदर्भातील सूत्रे पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/592289.html

पू. उमेश शेणै

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण !

११ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कुटुंबियांसह भेटण्याची संधी मिळणे, तेव्हा ‘कुटुंबात एक संत असेल, तर त्याचा लाभ कुटुंबातील सर्वांनाच होतो’, असे त्यांनी कुटुंबियांना सांगणे : डिसेंबर २०१३ मध्ये आम्ही कुटुंबीय माझ्या नातवाच्या (मुलीचा मुलगा कु. समर्थ (वय १६ वर्षे) याच्या) ब्रह्मोपदेशासाठी (मुंजीसाठी) माशेल, गोवा येथील देवकीकृष्ण रवळनाथ मंदिरात आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा मला माझी मुलगी (सौ. प्रिया प्रशांत प्रभु (वय ४० वर्षे) आणि मुलगा (डॉ. गणेश शेणै (वय ४३ वर्षे)) यांच्या कुटुंबियांसह गुरुदेवांना भेटण्याची संधी लाभली. या भेटीच्या वेळी गुरुदेव कुटुंबियांना म्हणाले, ‘‘आज मी उमेशअण्णांशी बोलणार नाही; कारण आम्ही भेटतो. आज मी तुमच्याशी (कुटुंबियांशी) बोलणार आहे.’’ असे म्हणून ते सर्व कुटुंबियांशी प्रेमाने बोलले. प्रत्येकाने सांगितले, ‘‘आम्ही सर्व जण छान आहोत. आम्हाला कोणताही त्रास नाही.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जण छान असल्याचे कारण तुमच्या कुटुंबात संत असलेले उमेशअण्णा आहेत. कुटुंबात कुणीतरी एक संत झाल्यास त्याचा लाभ कुटुंबातील सर्वच सदस्यांना होतो’, हे या उदाहरणावरून लक्षात येते.’’

११ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तुमचे मन स्थिर आणि शांत झाले आहे’, असे सांगणे : मला पुन्हा गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्हाला भेटल्यावर ‘तुमचे मन स्थिर आणि शांत झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे.  त्यामुळे तुमचे मन शांत अन् स्थिर झाले आहे.’’ त्यांचे हे बोल म्हणजे गुरुदेवांकडून मला मिळालेला आशीर्वाद आणि गुरुदेवांचा संकल्पच आहे.

११ इ. वरदहळ्ळी येथील प.प. श्रीधरस्वामींच्या आश्रमातून त्यांच्या वृंदावनावर घातलेली पवित्र वस्त्रे आणि तीर्थप्रसाद रामनाथी आश्रमात घेऊन येण्यास सांगणे : जानेवारी २०१९ मध्ये मला गुरुदेवांना भेटण्याची सुसंधी लाभली. प.पू. दास महाराज यांच्या आदेशाप्रमाणे मला वरदहळ्ळी येथील प.प. श्रीधरस्वामींच्या आश्रमातून त्यांच्या वृंदावनावर घातलेली पवित्र वस्त्रे आणि तीर्थप्रसाद रामनाथी आश्रमात घेऊन येण्याविषयी सांगण्यात आले होते. ‘ही गुरुदेवांनीच माझ्या नकळत माझी ‘त्यांच्याशी भेट व्हावी’ यासाठी दिलेली सुवर्णसंधी होती. मला पुष्कळ वर्षांनंतर रामनाथी आश्रमात जाण्याची संधी गुरुकृपेने लाभली होती.

११ इ १. वरदहळ्ळी येथून रामनाथी आश्रमात पोचलेल्या दिवशीच तेथे श्री भवानीमातेची प्राणप्रतिष्ठा होणार असल्यामुळे त्याचा लाभ मिळणे : वरदहळ्ळी येथील प.प. श्रीधरस्वामींच्या आश्रमातून मी रामनाथी आश्रमात गेलो. त्या दिवशी तिथे श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मी प.प. श्रीधरस्वामींचा आणलेला सर्व प्रसाद माझ्याकडून घेऊन मला श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना समारंभास उपस्थित रहाण्यास सांगितले, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला थोडे दिवस आश्रमात रहाण्यास सांगितले.

११ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कोणतेही श्रेय स्वतःकडे न घेता ते पू. उमेश शेणै यांना देणे : एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एका साधकाच्या समवेत झालेल्या भेटीच्या वेळी माझ्या शेजारी सौ. भाग्यश्री जोशी (पू. जयराम जोशीआबा (सनातनचे ५१ वे संत), मिरज आश्रम यांची सून) बसल्या होत्या. त्यांना अनिष्ट शक्तींचा त्रास असल्याने सत्संगाच्या वेळी त्यांना पुष्कळ जांभया येत होत्या. ते पाहून गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही उमेशअण्णांच्या बाजूला बसला आहात; म्हणून तुम्हाला चैतन्य मिळत आहे, साक्षात् गुरुदेव त्यांच्यापुढे बसले असतांना त्यांनी मला उद्देशून असे म्हणणे, म्हणजे गुरुदेव कोणतेही श्रेय स्वतःकडे न घेता ते इतरांना देत असल्याचे माझ्या लक्षात आले.

१२. अन्य संतांच्या भेटी !

१२ अ. रामनाथी आश्रमातील अनेक संतांच्या भेटी होणे : मी रामनाथीला असतांना माझी रामनाथी आश्रमात असलेल्या अनेक संतांशी भेट करवून देण्यात आली. हे सर्व माझ्या आध्यात्मिक जीवनातील स्मरणीय प्रसंग आहेत. त्या वेळी रामनाथी आश्रमात रहात असलेले प.पू. दास महाराज यांची भेट होऊन मला त्यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शक सूत्रे समजून घेण्याची संधी मिळाली. आश्रमात असतांना एके दिवशी सद्गुरु कुवेलकरआजींच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची संधी लाभली. त्यांच्याकडून मला ‘त्यांचा साधनाप्रवास, त्यांचा देवतांविषयी असलेला भाव आणि त्यांची प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा’, यांविषयी त्यांच्याशी झालेल्या वार्तालापाच्या वेळी शिकायला मिळाले.

१३. ‘हिंदु राष्ट्रा’चे, म्हणजे ईश्वरी राज्याचे प्रतीक असलेला रामनाथी आश्रम !

१३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आश्रमातील प्रत्येक साधकामध्ये ईश्वरी राज्य आणण्याची तळमळ अनुभवता येणे : आश्रमातील धान्य ठेवण्याची जागा, स्वयंपाकघर, बेकरी इत्यादी पहातांना ‘गुरुदेवांनी प्रत्येक ठिकाणी साधकांच्या क्षमतेनुसार त्यांचे नियोजन कसे केले आहे ? आणि ते सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी साधकांना कसे शिकवत आहेत ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘गुरुदेवांचे प्रत्येक साधकामध्ये ईश्वरी राज्य स्थापन करण्याच्या तळमळीचे ते चित्रण आहे’, याची मला जाणीव झाली. अशा महान गुरुदेवांच्या छत्रछायेखाली साधना करण्याची संधी देणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

१३ आ. रामनाथी आश्रम म्हणजे पुढे येणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’चे प्रतीकच असणे : आश्रमाला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती आश्रमाची व्यवस्था आणि तिथली सात्त्विकता यांविषयी अभिप्राय देतात. कुठेही न मिळणारे चैतन्य आणि शांत मनःस्थितीचा अनुभव सगळ्यांना येण्याचे मुख्य कारण म्हणजे आश्रमातील गुरुदेवांचे चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन ! त्यामुळे आश्रमाला भेट देणार्‍यांना संपूर्ण आश्रमच ‘हिंदु राष्ट्रा’चे प्रतीक असल्याची जाणीव होते. आश्रमातील साधक आणि त्यांच्या वागण्यातून जाणवलेली गोष्ट म्हणजे ‘हिंदु राष्ट्रातील प्रजा आणि तिथली व्यवस्था कशी असेल ?’, याचे प्रात्यक्षिक आहे.

१४. श्रीमन्नाराणाचे अवतारस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या निवासकक्षातील प्रत्येक वस्तूत चैतन्य जाणवणे

त्याच दिवशी मला गुरुदेवांच्या निवासकक्षात दैवी आणि आध्यात्मिक स्तरावरील झालेल्या पालटांविषयी कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका गाडगीळ) यांनी सविस्तर माहिती सांगितली. यातून ‘साक्षात् श्रीमन्नारायणाचा अवतार असलेल्या गुरुदेवांच्या अस्तित्वाने निवासकक्षाच्या परिसरात कसा पालट झाला ?’, हे मला पहायला मिळाले. ‘गुरुदेवांच्या निवासकक्षात असलेल्या प्रत्येक वस्तूत त्यांचे चैतन्य निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.

१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटी आणि रामनाथी आश्रमातील अनुभव यांच्या स्मरणात पूर्ण आठवडा भावस्थितीत व्यतीत होणे

‘गुरुदेवांनी प्रत्येक साधकात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे बीज कसे रुजवले आहे ?’, हे मला पहायला मिळाले. एक आठवडा मी गुरुदेवांशी झालेल्या भेटी आणि मला आश्रमात आलेले अनुभव यांविषयी स्मरण करत भावावस्थेत घालवला. त्याच दिवशी संध्याकाळी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी माझी साधना, आश्रमातील अनुभव आणि गुरुदेवांच्या भेटी यांविषयी सविस्तर विचारले. येणार्‍या काळात वेळ मिळाल्यास कुटुंबासह आश्रमाला भेट देण्याविषयी सांगितले.
माझे रामनाथी आश्रमातील वास्तव्याचे सर्व नियोजन छान झाल्यामुळे मी कृतज्ञता व्यक्त केली.                    (समाप्त)
– (पू.) श्री. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल.