परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७३ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

२८.६.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. उमेश शेणै यांची संत होईपर्यंत त्यांच्याकडून करवून घेतलेली साधना पाहिली. आजच्या भागात पू. उमेश शेणै देवद आश्रमात आल्यावर झालेला साधनाप्रवास पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/592062.html

पू. उमेश शेणै

६. देवद आश्रमात लाभलेला संतांचा सहवास आणि सत्संग !

६ अ. देवद आश्रमात आल्यावर अनेक संतांचा सत्संग लाभून त्यांचे गुण जाणून ते आत्मसात करता येणे : देवद आश्रमात आल्यावर मला मिळालेली मोठी संधी म्हणजे इथे असलेल्या संतांचा सत्संग ! मला वेगवेगळ्या संतांसह त्यांच्या निवासस्थानी रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला इथले अनेक संत करत असलेली साधना आणि त्यांचे गुण जाणून घेऊन आत्मसात करण्यास साहाय्य झाले. गुरुदेवांनी मला एवढ्या संतांच्या सहवासात ठेवून ते करत असलेली साधना आणि त्यांनी केलेल्या सेवा यांविषयी सविस्तर समजून घेण्याची संधी दिली.

६ आ. सर्व संतांचे विचार समजल्यामुळे पुष्कळ लाभ होणे : आठवड्यातून एकदा होत असलेला संतांचा सत्संग, म्हणजे संतांसाठी श्री गुरूंनी दिलेले एक व्यासपीठच होते. या सत्संगात संतांना साधनेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी सविस्तरपणे सांगण्यात येते. त्यामुळे आम्हाला साधनेची दिशा मिळते. प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि प्रकृती भिन्न असल्याने आम्हाला साधनेसाठी पुष्कळ विषय शिकायला मिळायचे. या सत्संगात सर्व संत मनमोकळेपणाने विचार मांडत असल्याने त्याचा मला पुष्कळ लाभ होत आहे.

६ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सत्संग लाभणे : देवद आश्रमात असतांना मला झालेला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सत्संगाचा लाभ, म्हणजे माझे अहोभाग्यच म्हणावे लागेल. मी वरचेवर त्यांच्या कक्षात जाऊन त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेत असे. त्यांच्या आशीर्वचनाचा लाभ आश्रमातील आम्हा सर्वांना नेहमीच मिळत होता. ‘अशा महान संतांचे मार्गदर्शन मिळणे’, हे आम्हा सर्वांचे पूर्वजन्माचे सुकृतच म्हणावे लागेल.

६ ई. दोन ज्येष्ठ संतांच्या हस्ते वाढदिवस साजरा होणे : माझ्या ७० व्या वाढदिवसाच्या वेळी प.पू. दास महाराज देवद आश्रमात आले होते. तेव्हा प.पू. दास महाराज यांनी प.पू. पांडे महाराज यांच्या हस्ते मला शाल देऊन माझा सन्मान केला. हा माझ्या जीवनातील एक सुवर्ण क्षणच होता. ‘ध्यानीमनी नसतांना माझ्या वाढदिवसाला दोन ज्येष्ठ संतांकडून माझा सत्कार होणे’, हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल. प.पू. दास महाराज आणि माझे संबंध हे पूर्वजन्मीचे सुकृतच आहे.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका देवद आश्रमात आल्यावर त्यांची पूजा करण्याची आणि आश्रमाच्या ध्यानमंदिरात त्यांची स्थापना करण्याच्या सेवेची संधी मला देण्यात आली. हे गुरुकृपेने मला लाभलेले मोठे भाग्यच होते.

८. पाठदुखीचा त्रास असल्याचे कुणापाशीही न बोलता सर्वांतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सेवा आणि नामजप करतांना आरामात बसता येईल’, अशी आसंदी पाठवल्याने गुरुदेवांचे महानत्व कळून कृतज्ञता वाटणे

मला अनेक वर्षांपासून पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे मला पुष्कळ वेळ बसल्यास पाठीत वेदना होतात. याविषयी मी कधी कोणाला सांगितले नव्हते. देवद आश्रमात सेवा करतांना मला दिलेली आसंदी मला आराम देणारी नव्हती; परंतु मी त्यात विनातक्रार बसत होतो, तसेच मला प्रतिदिन २ – ३ घंटे नामजपासाठीही बसावे लागत असे. त्यामुळे माझी पाठदुखी पुष्कळ वाढली. याविषयी मी कोणापाशीही बोललो नव्हतो; पण सर्वांतर्यामी (सर्वांच्या अंतरात असलेल्या) श्री गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सर्व समजले. वर्ष २०१९ मध्ये माझ्यासाठी आरामखुर्ची पाठवण्यात आली. त्यामुळे मला नामजपासाठी काही घंटे आरामात बसता येऊ लागले. सेवेच्या ठिकाणीही मला अनुकूल अशा आसंदीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सेवा आणि नामजप करतांना होणारी माझी पाठदुखी पुष्कळ न्यून झाली.

त्यातून ‘साधकाने त्रास सांगितले नाहीत, तरी गुरुदेव जाणून ते दूर करतात’, हे मला शिकायला मिळाले. त्यामुळे मला गुरुदेवांच्या अलौकिक महिमेची जाणीव झाली. असे महान गुरु आम्हाला देणाऱ्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

९. देवद आश्रमात समष्टी सेवेची मिळालेली सुसंधी !

९ अ. अनेक वेळा समष्टीसाठी नामजप करण्याची संधी मिळणे : देवद आश्रमात अनेक संत असल्यामुळे संत आणि साधक यांच्यासाठी मंत्रजप करण्याची संधी मिळते. अनेक वेळा मलाही ते मंत्रजप करण्याची संधी मिळाली. ‘साधक आणि संत यांना वरचेवर होणारे आजार अथवा वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे होणारे त्रास’ यांसाठी मला पुष्कळ वेळा मंत्रजप करण्याची संधी मिळत होती. त्यामुळे माझी समष्टी सेवाही होत होती.

९ आ. सात्त्विक उत्पादनांच्या सेवेची संधी मिळणे : देवद आश्रमात सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा शिकून घेण्याची मला संधी मिळाली.

१०. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे साधनेसाठी मिळणारे अमूल्य मार्गदर्शन !

१० अ. सेवाकेंद्रात रहात असतांना अन् आता देवद आश्रमात आल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ होणे : माझे महत् भाग्य, म्हणजे सद्गुरु राजेंद्रदादांची (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची) माझ्यावरील प्रीती आणि मला साधनेच्या पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्याची त्यांची तळमळ ! मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना सद्गुरु राजेंद्रदादांनी मला केलेले मार्गदर्शन माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी अमूल्य आहे. सेवाकेंद्रात असतांना माझ्याकडून झालेल्या चुका सांगून, मला मार्गदर्शन करून आणि माझे शुद्धीकरण करून मला या स्थितीला आणण्यात सद्गुरु राजेंद्रदादांचा अमूल्य सहभाग आहे. गुरुकृपेने देवद आश्रमात आल्यावर मला पुन्हा त्यांचे मार्गदर्शन आणि सत्संग यांचा लाभ मिळू लागला. प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या संतांच्या सत्संगात मला त्यांचे अत्यंत अमूल्य दृष्टीकोन मिळत होते.

१० आ. सांसारिक जीवन आणि साधना यांतील अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य दृष्टीकोन देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे ! : सद्गुरु राजेंद्रदादांची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असते. त्यांनी माझ्या वैयक्तिक अडचणींविषयीही जाणून घेऊन, त्यावर योग्य दृष्टीकोन देऊन मला साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेले. हे माझे कोणत्या तरी जन्माचे पुण्य आहे. ते माझी पुष्कळ काळजी घेतात. हा मला मिळालेला गुरुकृपेचा आशीर्वादच आहे. माझ्या तोंडवळ्यावर होणारा किंचितसा पालटही हेरून ते मला त्यांच्या कक्षात बोलावून त्याविषयी सर्व सविस्तर जाणून घेऊन योग्य दृष्टीकोन देतात.

१० इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी वैयक्तिक जीवन आणि साधना यांतील अडचणींवर मार्गदर्शन करून योग्य दृष्टीकोन दिल्यामुळे साधनेतील अडथळे दूर होणे अन् ही मोठी गुरुकृपाच असणे : माझ्या संसारातील काही अडचणींवर मला सद्गुरु राजेंद्रदादांचे मार्गदर्शन आणि दृष्टीकोन मिळाले नसते, तर माझ्या आध्यात्मिक जीवनात त्याचा मोठा अडथळा निर्माण झाला असता. असे सद्गुरु या आश्रमाला देऊन गुरुदेवांनी मोठी कृपाच केली आहे. सद्गुरु राजेंद्रदादांकडून मिळणारे मार्गदर्शन ही आम्हा सर्वांवर असलेली गुरुकृपाच आहे. गुरुदेवांनी मला ‘मंगळुरू येथून देवद आश्रमात का पाठवले ?’, हे मला टप्प्याटप्प्याने समजू लागले आहे. ‘मी मंगळुरू सेवाकेंद्रात सेवा करत असतांना सद्गुरु राजेंद्रदादांचे तिकडे झालेले आगमन अन् आता या आश्रमात पुन्हा माझ्या पुढच्या आध्यात्मिक साधनेसाठी त्यांच्याशी आलेला संबंध हे केवळ माझ्या साधनेसाठीच आले आहेत’, असा माझा दृढ विश्वास आहे.                      (क्रमशः)

– पू. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/592596.html