विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे आमदार विनय कोरे यांना निवेदन
वारणानगर (जिल्हा कोल्हापूर), १६ जून (वार्ता.) – शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. गडावर १०० ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हा विषय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, श्री. अजिंक्य पाटील, श्री. गौतमेश तोरस्कर उपस्थित होते.
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाध्यांच्या जिर्णाेद्धाराविषयी आपण स्वतंत्र बैठक घेऊ, तसेच विशाळगडावर स्वच्छता राखण्याविषयीही सूचना देऊ, असे आमदार विनय कोरे यांनी या वेळी सांगितले.